मुंबईः गेल्या आठवड्यात राज्यात प्रवेश गेलेला मान्सून एलनिनोच्या प्रभावामुळे उत्तरेकरील उष्ण वारे व पश्चिमेकडील वाऱ्यांच्या व्यत्ययामुळे आद्रतेचा प्रवाह खंडीत झाल्याने कोकणातील हरनई आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे थांबला होता. मात्र आता मान्सूनला पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे.मान्सूनला पुढील वाटचालीस येत्या तीन चार दिवसात परिस्थिती अनुकूल होईल. सध्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सांगली या जिल्हयात मान्सूनचे आगमन झाले आहे. त्यामुळे येत्या १८ ते २० जून दरम्यान संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. ही राज्यासासाठी विशेषतः बळीराजासाठी दिलासादायक बाब असल्याची माहिती मंगळवारी मदत आणि पुनर्वसन विभागाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे मंंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.
येत्या काही दिवसात राज्यभरात विशेषतः मराठवाडा, मध्यमहाराष्ट्र, कोकणात विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पाऊस पडेल. मात्र २३ ते २८ जून दरम्यान मान्सून राज्यभरात सक्रीय होत असतानाच मुंबई, ठाणे आसपासच्या किनारी भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत सुमारे २५० ते ३०० मिलीमीटर पावसाची शक्यता असल्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. या पावसाने मुंबई महानगर प्रदेशातील महापालिकांच्या नालेसफाईच्या दाव्यांची परिक्षा होणार असली तरी अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे सतर्क राहण्याच्या सूचना महापालिकांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वळीव आणि हवामान बदलाचा केळी, काजू, आंब्याला फटका
राज्यात गेल्या दीड दोन महिन्यात वळीवाचा पाऊस आणि हवामानातील बदलाचा सर्वाधिक फटका केळी आणि आंबा फळांना बसला आहे. वादळामुळे जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, लातूर, परभणी बुलढाणा, अकोला, अमरावती आदी जिह्यात केळी पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. वादळामुळे सुमारे १८ हजार २२८ हेक्टरवरील केळी पिकांचे तर हवामातील बदलामुळे कोकणातील ७८ हजार ३०३ हेक्टर वरील आंबा फळाचे नुकसान झाले आहे. तसेच ५३ हजार ८३४ हेक्टरवरील काजूचेही नुकसान झाल्याची माहिती मंत्रिमंडळात देण्यात आली.
