मुंबई : मोसमी पावसाची आगेकूच बंद झाली आहे. मोसमी पावसाची वाटचाल २३ जूननंतरच सुरू होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुरेसा पाऊस पडेपर्यंत पेरणी न करण्याचे आवाहन कृषी विभागाने करावे. तुर्तास पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत नाही. मात्र, कमी पावसाची शक्यता असल्यामुळे हंगामात पडणाऱ्या पावसाचे पाणी प्राधान्याने पिण्यासाठी राखीव ठेवा. ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्यासाठी पाणी पुरेल, असे नियोजन करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत संबंधित विभागाला दिल्या.
मोसमी पावसाची आगेकूच थांबल्याचे पडसाद राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत उमटले. कृषी, आपत्ती व्यवस्थापन व मदत पुनर्वसन आणि जलसंपदा विभागाच्या वतीने बैठकीत माहितीचे सादरीकरण करण्यात आले.
पावसाअभावी सर्व प्रकारच्या पेरण्या रखडल्या आहेत. राज्याच्या काही भागांत होणाऱ्या धूळपेरण्याही थांबल्या आहेत. मंगळवारअखेर सरासरी एक टक्का पेरणी झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली. मोसमी पाऊस सिंधूदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात दाखल झाला असला तरीही पावसात पुरेसा जोर नाही. उत्तरेकडील उष्ण वाऱ्यांमुळे मोसमी पावसाची आगेकूच थांबली आहे. पाच दिवसांनंतर मोसमी वाऱ्याच्या प्रगतीला पोषक वातावरण निर्माण होऊन, २३ जून नंतरच राज्यात पावसाची आगेकूच सुरू होईल.
राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा अपुरा असल्याने पाणी जपून वापरण्याची गरज आहे. राज्यातील मोठ्या धरणांत २४ टक्के पाणीसाठा आहे. मध्यम प्रकल्पात ३१ टक्के आणि लघु प्रकल्पात २३ टक्के, असा एकूण २५ टक्के पाणीसाठा आहे. उजनी धरणाने तळ गाठला असून, पाणीसाठी शून्यावर गेला आहे. कोयनेत ९ टक्के, जायकवाडीत २९ टक्के, भातसा ३२ टक्के, गोसेखुर्द ३४ टक्के, खडकवासला धरण साखळीत१७ टक्के, अप्पर वर्धा ४४ टक्के, अप्पर वैतरणा ३६, भंडारदरा धरणात १९ टक्के पाणीसाठा असल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले.
कृषी, आपत्ती व्यवस्थापन आणि जलसंपदा विभागाच्या सादरीकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या पावसाळ्यावर एल निनोचे संकट आहे. कमी पावसाची शक्यता असल्यामुळे पावसाळ्यात पडलेल्या पाण्याचे काटेकोर नियोजन करा. सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई नसली तरीही पुढील वर्षी उन्हाळ्यात टंचाई जाणवेल, त्यामुळे ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्यासाठीच्या पाण्याचे नियोजन करा, अशा सूचना फडणवीस यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.
विदर्भ, मुंबईला तुर्तास पाणी दिलासा
उजनी धरणाच्या पाण्याने तळगाठला असला तरीही विदर्भ आणि मुंबईला तुर्तास पाणी टंचाईची भीती नाही. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणात ३२ टक्के तर अप्पर वैतरणा धरणात ३६ टक्के पाणीसाठा आहे. विदर्भातील पेंच समूह प्रकल्पात तब्बल ५२ टक्के, इसापूर धरणात ४३ टक्के, अप्पर वर्धा धरणात ४४ टक्के आणि गोसीखुर्द धरणात ३४ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे तुर्तास विदर्भ आणि मुंबईला पाणी दिलासा मिळाला आहे. कोयना धरणात नऊ टक्के, जायकवाडीत २९ टक्के पाणीसाठा आहे.
धरणांतील पाणीसाठा (टक्के)
मोठे प्रकल्प – २४
मध्यम प्रकल्प – ३१
लघु प्रकल्प – २३
एकूण पाणीसाठा – २५ टक्के
