मुंबई : पावसाने जुलै महिन्यात महाराष्ट्रसह अनेक भागांना दिलासा दिला होता. त्यानंतर ऑगस्टच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला. दरम्यान, विविध हवामान मॉडेल्सच्या आधारे व्यक्त केलेल्या हवामान अंदाजानुसार, ऑगस्ट अखेरीस बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रांची सक्रियता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनला बळ मिळण्याचा अंदाज असून अनेक भागात चांगला पाऊस नोंदवला जाऊ शकतो. असे झाल्यास देशातील काही भागात असणारी पावसाची तूट भरून निघण्यास मदत होणार आहे.
यंदा देशातील अनेक भागात चांगला पाऊस झाला असला तरीही त्याचे प्रणाम असमान आहे. यामुळे बहुतांश प्रदेशात पावसाची तूट कायम आहे. महाराष्ट्राचा विचार करता जुलै महिन्याच्या सुरुवातीस आणि अखेरीस बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या प्रणालींमुळे अनेक जिल्ह्यांत सर्वदूर पावसाची नोंद झाली. दरम्यान, सध्या राज्यातील काही भागात वादळी पावसाची नोंद होत असून बहुतांश प्रदेशात पावसाचा जोर कमी झाला आहे. काही दिवसांपासून मध्य महाराष्ट्रातील घाट प्रदेशांसह कोकण प्रदेशात चांगला पाऊस नोंदवला जात आहे, तर उर्वरित राज्यात पावसाचा जोर कमी आहे.
पावसाची शक्यात कुठे ?
दरम्यान, हवामान विभागाने विदर्भातील बहुतांश भागात १४ ते १८ ऑगस्टदरम्यान पावसाची शक्यता व्यक्त केली असून १८ ऑगस्टनंतर या प्रदेशात पावसाचा जोर काहीसा कमी होईल. तर विदर्भातील काही भागात १९ ते २० ऑगस्टदरम्यान पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच कोकणातील बहुतांश भागात १४ ते २० ऑगस्टदरम्यान पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज असून यादरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे.
कमी दाबाच्या क्षेत्रांचा प्रभाव वाढणार
दरम्यान, उर्वरित ऑगस्टमध्ये पुन्हा बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालींमुळे महाराष्ट्रातील काही भागांसह मध्य, पूर्व आणि उत्तर भारताच्या काही जिल्ह्यांत दिलासादायक पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात भारतातील मान्सूनच्या हंगामातील सर्वाधिक सक्रिय टप्प्यांपैकी एक असलेल्या टप्प्याला प्रारंभ होईल, असा हवामान अभ्यासकांचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे देशातील अनेक भागात दीर्घ काळ मान्सून सक्रिय असतो. ऑगस्ट अखेरपर्यंत एका मागून एक कमी दाबाची क्षेत्रे तयार होतील, अशी शक्यता विविध हवामान मॉडेल्सच्या आधारे व्यक्त करण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाची प्रणालीमुळे लगतच्या प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वाढते.
