मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात वादळी पावसाची नोंद होत असून सोमवारीही काही प्रदेशात मुसळधार तर काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. दरम्यान, पुढील तीन चार दिवस राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज असला तरीही सर्वदूर पावसाची शक्यता कमीच आहे, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. तसेच राज्यातील काही प्रदेशांवर आज वादळी पावसाचा प्रभाव राहील, तर उर्वरित भागात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यात यंदा मान्सून उशिराने दाखल झाला. मात्र, सुरुवातीपासूनच सर्वदूर पावसाचा अभाव दिसून येत असल्याने राज्यातील बहुतांश भागात आतापर्यतच्या हंगामाच्या सरासरी पावसाहून कमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच मान्सूनचा खंड वाढत असल्याने बहुतांश भागात पावसाची नोंद होत असली तरीही सर्वदूर पावसाचा अभाव असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. दरम्यान, मान्सूनला बळ मिळण्यासाठी सक्रिय हवामान प्रणालीची आवश्यकता असते. मागील काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या प्रणालीमुळे राज्यातील काही भागात वादळी पावसाची नोंद होत आहे. सध्या बंगालचा उपसागर आणि आंध्र प्रदेशच्या किनारी प्रदेशात चक्रीय वाऱ्यांची प्रणाली सक्रिय असून त्याच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरापासून दक्षिण गुजरातपर्यंत एक लांब कमी दाबाचा पट्टा (ट्रफ) पसरलेला आहे. त्यामुळे गुजरात मधील काही भागांसह राज्यातील कोकण प्रदेश आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाची नोंद होत आहे. तसेच राज्यातील इतरही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा सरी नोंदल्या जात आहे.

दरम्यान, राज्यातील कोकण प्रदेशासह मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मंगळवारी हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलक्या सरींचा अंदाज व्यक्त केला असून उर्वरित राज्यात आज हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आज ‘ऑरेंज’ आणि ‘यलो अलर्ट’ कुठे ?

रायगड, मुंबई, ठाणे, पुणे घाट विभाग आदी भागांना हवामान विभागाकडून मंगळवारी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून पालघर, नाशिक घाट विभाग, रत्नागिरी आणि सातारा घाट विभाग आदी प्रदेशांना हवामान विभागाकडून वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे. तसेच नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि नांदेड आदी भागात हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.