मुंबई : ऑगस्ट महिन्यापासून राज्यात सर्वदूर पावसाचा अभाव असून त्यामुळे बहुतांश जिल्ह्यांत पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला असला तरी बहुतांश भाग कोरडे होते. पुढील दोन दिवसांत हवामान प्रणालीच्या सक्रियतेमुळे हवामान विभागाने राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता वर्तवली असून काही भागात मुसळधार पावसाची, तर काही भागात वादळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी राज्यातील बहुतांश भागात मागील काही दिवसांच्या तुलनेत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.

यंदा राज्यात पावसाचे प्रमाण असमान आहे. त्यामुळे अनेक भागात पावसाची तूट कायम असून त्याचा थेट परिणाम शेतीवर होत असल्याने शेतकरी संकटात आहेत. मोसमी पावसाचा हंगाम अंतिम टप्यात आहे. त्यामुळे पुढील काही दिवस हवामान कसे असेल याकडे राज्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. यादरम्यान चांगला पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून पुढील तीन दिवसांत हे क्षेत्र ओडिशापासून गुजरातपर्यंत पुढे सरकण्याचा अंदाज आहे. या हवामान प्रणालीच्या सक्रियतेमुळे गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा, छत्तीसगड आणि दक्षिण मध्य प्रदेश आदी राज्यांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव ११ ते २३ सप्टेंबरपर्यंत राहण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. याआधी जुलै महिन्यात बंगालच्या उपसागरात तयार झालेली कमी दाबाची क्षेत्रे गुजरातच्या दिशेने पुढे सरकली होती. त्यामुळे राज्यात सर्वदूर मुसळधार पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे जून महिन्यातील पावसाची तूट काहीशी भरून निघाली होती.

दोन दिवस सर्वाधिक प्रभाव

हवामान विभागाने शुक्रवारी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यात व्यक्त केली आहे. तसेच शनिवारी दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भाग वगळता उर्वरित राज्यात बहुतांश जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच रविवारी उत्तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक घाट विभाग, धुळे आणि नंदुरबार येथे हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ दिला असून कोकण, मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात तर मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात वादळी पावसाची शक्यता आहे.