मुंबई : राज्यात यंदाच्या पावसाळ्यात सरासरी १९ टक्के कमी पाऊस झाल्यामुळे सर्वांची परतीच्या मोसमी पावसावर भिस्त होती. पण, शनिवार, ३ ऑक्टोंबरपर्यंत मुंबई, पुण्यासह निम्या राज्यातून मोसमी पाऊस माघारी फिरला आहे. त्यामुळे आता परतीच्या पावसाची आशाही मावळली आहे. ऑक्टोंबर महिन्यात तुर्तास वादळी पावसाची शक्यताही नाही, त्यामुळे खरीप पाठोपाठ रब्बी हंगामाही अडचणीत आला आहे.

पावसाळ्यात राज्यात सरासरी ९०४.५ मिमी पाऊस पडतो, यंदा ८०४ मिमी म्हणजे सरासरीच्या १९ टक्के कमी पाऊस झाला आहे. सर्वांची परतीच्या मोसमी पावसावर भिस्त होती. शनिवारी, ३ ऑक्टोंबरपर्यंत मुंबई, पुणे, परभणी आणि ब्रह्मपुरीच्या उत्तरेकडील भागातून मोसमी पाऊस माघारी फिरला आहे. पुढील आठवड्यात संपूर्ण राज्यातून पाऊस माघारी जाईल. त्यामुळे परतीचा पाऊस होण्याची आशाही मावळली आहे.

पावसाअभावी खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद हातचे गेले आहे. तूर, कापूस आणि रब्बी हंगामाचे भवितव्य परतीच्या पावसावर अवलंबून होते. पण, परतीचा पाऊस न पडल्यामुळे तूर आणि कापसालाही मोठा फटका बसणार आहे. मुळात सिंचनासाठीच्या पाण्याची टंचाई जाणविण्याची शक्यता असल्यामुळे रब्बीच्या पेरण्यांमध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे.

रब्बी लागवडीचे क्षेत्र ५४ लाख हेक्टर

राज्यात रब्बी हंगामात सरासरी ५४ लाख हेक्टरवर पेरणी होते. त्यात सर्वांधिक २१ लाख हेक्टरवर हरभरा, १० लाख हेक्टरवर गहू, रब्बी ज्वारी १७ लाख हेक्टरवर, मका २.५ लाख हेक्टरवर आणि करडईची २.६ लाख हेक्टरवर पेरणी होते. चांगल्या जमिनीत गहू पिकाला पाच ते सहा वेळा पाणी द्यावे लागते. यंदा सहा वेळा पाणी देण्यासारखी स्थिती नाही. त्यामुळे बहुतांश शेतकरी कमी पाण्यावर येणाऱ्या ज्वारी, हरभरा, सूर्यफूल सारख्या पिकांकडे वळण्याची शक्यता आहे.

रब्बी हंगामासाठी प्रतिकूल बाबी

पावसात तूट निर्माण झाल्यामुळे सिंचनासाठी पाण्याची टंचाई

धरणांतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवल्यामुळे रब्बीसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्याची शक्यता नाही

चारा टंचाईमुळे कमी पाण्यात, कमी दिवसात येणाऱ्या चारा पिकांकडे कल

एल – निनो तीव्र होण्याची शक्यतेमुळे तापमान वाढ, उष्णतेच्या झळांची शक्यता

रब्बी ज्वारीच्या बियाणांचा पुरवठा करणार

पाण्याची उपलब्धता कमी आहे. भविष्यात दमदार पावसाची शक्यता नाही. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे. रब्बीसाठी धरणांतून पाण्याची आवर्तने सोडणे अशक्य होणार आहे. जिथे पाणी उपलब्ध आहे, त्या ठिकाणी कमी पाण्यात येणाऱ्या रब्बी ज्वारीसह अन्य चारा पिके घेण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना रब्बी ज्वारीच्या बियाणांचा पुरवठा केला जाईल, अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

सर्वदूर दमदार पावसाची शक्यता कमी

निम्या राज्यातून माघारी फिरलेला मोसमी पाऊस पुढील आठवड्यात संपूर्ण राज्यातून माघारी जाईल, त्यानंतर पावसाची शक्यता आणखी कमी होईल. नजीकच्या भविष्यात राज्यात दमदार, सर्वदूर वादळी पाऊस होण्याची शक्यता नाही. अपवादात्मक ठिकाणी पाऊस झाला तरीही, तो रब्बी हंगामासाठी पुरेसा ठरू शकणार नाही. हवेत बाष्पाचे प्रमाण कमी असल्यामुळे आणि एल – निनो स्थितीमुळे तापमानात सरासरी २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली.