मुंबई : राज्यातील रिक्षा, टॅक्सी व ॲपवर आधारित कॅब चालकांना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी आता व्यावहारिक मराठीचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये करण्यात आलेल्या नव्या सुधारणांमुळे ही अट स्पष्ट झाली आहे. नव्या नियमानुसार, चालकाला आवश्यक मराठी येत नसल्याचे आढळल्यास संबंधिताचा वाहन चालविण्याच्या अनुज्ञप्तीवरील अधिकृतता जास्तीत जास्त तीन महिन्यांसाठी निलंबित करता येणार आहे. निलंबनानंतरही चालकाने नियमांचे पालन न केल्यास अनुज्ञप्तीची संबंधित अधिकृतता रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

महाराष्ट्र मोटार वाहन नियमांमध्ये केलेल्या सुधारणांमध्ये रिक्षा, टॅक्सी तसेच ॲपवर आधारित मोटार कॅबच्या अधिकृत चालकांसाठी व्यवहारिक मराठीचे ज्ञान आवश्यक करण्यात आले आहे. प्रवाशांशी संवाद साधणे, त्यांचे म्हणणे समजून घेणे व सुरक्षित प्रवासासाठी ही अट करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

परवानाधारकांनाही मराठी आवश्यक

ही अट केवळ चालकांपुरती मर्यादित नसून सुधारित नियमांनुसार संबंधित परवानाधारकाकडेही व्यवहारिक मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच ॲप-आधारित मोटार कॅबच्या परवान्याचे नूतनीकरण करतानाही परवानाधारकाला मराठीचे समाधानकारक ज्ञान असल्याचे संबंधित प्राधिकरणाला पटवून द्यावे लागणार आहे.

नियम अधिक स्पष्ट

या सुधारणांना ‘महाराष्ट्र मोटार वाहन कायदा-२०२६’ म्हणणे योग्य नसून, हे ‘महाराष्ट्र मोटार वाहन (सुधारणा) नियम, २०२६’ आहे. मोटार वाहन अधिनियम, १९८८ अंतर्गत महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये हे बदल करण्यात आले आहेत. यापूर्वी मराठी भाषेच्या ज्ञानाबाबत नियमांमध्ये काही संदिग्धता असल्याने त्याचा आधार घेत काही चालक या अटीचे पालन करीत नसल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे नियमांमधील संदिग्धता दूर करून व्यावहारिक मराठीची अट अधिक स्पष्ट करण्यात आली आहे.

नियम ४ मध्ये ‘मराठी भाषेचे कार्यकारी ज्ञान’ अनिवार्य

महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ४ च्या उपनियम (४) मध्ये ‘पूर्वसूचक’ या शब्दांनंतर ”मराठी भाषेचे व्यावहारिक ज्ञान” हे शब्द समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित अधिकृततेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे आवश्यक पात्रतेसह मराठी भाषेचे कार्यकारी अर्थात व्यावहारिक ज्ञान असणे आवश्यक आहे.

प्रवाशांशी संवाद साधणे, त्यांचे म्हणणे समजून घेणे व सुरक्षित व सुलभ प्रवास सुनिश्चित करण्यासाठी चालकांना स्थानिक भाषेचे व्यावहारिक ज्ञान आवश्यक आहे. त्यामुळे या नियमांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करता येईल. – प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री