मुंबई : राज्यातील व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांना १६ ऑगस्टपासून व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान बंधनकारक असणार आहे. यासाठी महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ४, २२, ७८ आणि ८५ मध्ये सुधारणा केल्या असून यासंदर्भातील अधिसूचना बुधवारी जारी करण्यात आली, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
सरनाईक म्हणाले की, हा निर्णय कोणत्याही भाषेच्या विरोधात नसून प्रवासी सुरक्षा, चालक-प्रवासी यांच्यातील सुलभ संवाद आणि सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक ग्राहकाभिमुख करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे. स्पष्ट संवादामुळे गैरसमज टळतील, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळेल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, असे त्यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्राने रोजगारासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे नेहमीच स्वागत केले आहे. मात्र, राज्यातील जनतेशी संवाद साधण्याइतपत व्यवहारिक मराठीचे ज्ञान असणे ही केवळ कायदेशीर अट नसून सामाजिक जबाबदारीही आहे.
या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी परिवहन विभागाने गेल्या काही महिन्यांपासून राज्यभर प्रशिक्षण मोहीम राबविली आहे. कोकण मराठी साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ आणि राज्याच्या मराठी भाषा विभागाच्या सहकार्याने हजारो शिक्षकांची फळी तयार करण्यात आली असून, विविध प्रादेशिक परिवहन कार्यालये आणि प्रशिक्षण केंद्रांमध्ये चालकांसाठी व्यवहारिक मराठीचे वर्ग आयोजित करण्यात आले आहेत.
या प्रशिक्षणात प्रवाशांशी नम्र संवाद, दिशा सांगणे, भाडे, आपत्कालीन परिस्थिती, तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांशी प्रभावी संवाद साधण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी सोप्या पुस्तिका, संवादमाला आणि अभ्यास साहित्य तयार करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात रोजगार करणाऱ्या प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगावा, तसेच महाराष्ट्राच्या मातृभाषेलाही मनापासून स्वीकारावे. मराठीचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, इतिहासाचा आणि जनतेच्या भावनांचा सन्मान आहे, असे सरनाईक यांनी सांगितले.
या निर्णयामुळे भाषिक स्वाभिमान, प्रवासी सुरक्षा आणि सार्वजनिक सेवेचा दर्जा उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी सर्व व्यावसायिक चालक, वाहनमालक आणि परिवहन संघटनांनी या उपक्रमात सकारात्मक सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
प्रवासी सुरक्षा, सुलभ संवाद आणि ग्राहकाभिमुख सेवा हे निर्णयामागील प्रमुख उद्दिष्ट आहे. यासाठी राज्यभर चालकांसाठी व्यवहारिक मराठीचे प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांशी प्रभावी संवादासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार केला आहे.
