मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने गुरुवारी इयत्ता पाचवी (पूर्व प्राथमिक) आणि इयत्ता आठवीचा (पूर्व माध्यमिक) शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर केला. या दोन्ही परीक्षांचा निकाल २२.९७ टक्के इतका लागला आहे. यामध्ये इयत्ता पाचवीचा निकाल २४.७४ टक्के तर इयत्ता आठवीचा निकाल १९.९४ टक्के इतका लागला आहे. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता यादी परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेचे हे अखेरचे वर्ष असणार आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २२ फेब्रुवारी रोजी इयत्ता ५ वी आणि इयत्ता ८ वीची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली होती. या परीक्षेसाठी राज्यभरातून १० लाख ४४ हजार ८०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यात इयत्ता पाचवीसाठी ६ लाख ५७ हजार १७६ तर इयत्ता आठवीसाठी ३ लाख ८७ हजार ६२७ विद्यार्थ्यांचा समावेश होता. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी १ लाख १० हजार ५४१ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. यामध्ये इयत्ता पाचवीसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ६ लाख ३६ हजार ५८०, तर इयत्ता आठवीचे ३ लाख ७३ हजार ९६१ विद्यार्थी उपस्थित होते.
परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यामधून २ लाख ३२ हजार २९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यातील ३३ हजार २८० विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. पात्र विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांची संख्या १६ हजार ६९३ असून, २४.७४ टक्के निकाल लागला आहे. तसेच इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांची संख्या १६ हजार ५८७ इतकी असून, १९.९४ टक्के निकाल लागला आहे.
इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल १८ मे रोजी जाहीर करण्यात आल होता. त्यानंतर १८ ते २७ मे या कालावधीत गुणपडताळणीसाठीचे अर्ज शाळांमार्फत ऑनलाईन मागविले होते. या कालावधीत प्राप्त अर्ज निकाली काढून या परीक्षांचा अंतिम निकाल तयार करण्यात आला. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचा अंतिम निकाल परिषदेच्या https://mscepune.in व https://2026.puppssmsce.in/ या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
विद्यार्थ्यांना त्यांचा स्वतःचा बैठक क्रमांक, आईचे नाव टाकून निकाल पाहता येईल. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र त्याच्या बँक खात्याची व आधार क्रमांकाची माहिती भरल्याशिवाय पाहता येणार नाही. परंतु संकेतस्थळावरील गुणवत्ता यादीत त्याला स्वतःचा शिष्यवृत्ती संच प्रकार (अर्हता) पाहता येईल, असे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
