मुंबई : राज्यात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) स्वतंत्र आयुक्तालय स्थापन केले जाईल. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेतून कोकणासह राज्यात फळ प्रक्रिया उद्योग उभारण्यात येतील, अशी घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केली.
सत्यजित तांबे यांनी या बाबतचा प्रश्न उपस्थितीत केला होता. टॅक्सी व्यवसाय, रिक्षा व्यवसाय, फूड ट्रक व्यवसायाठी बेरोजगार तरुण, तरुणींना कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. एकाच उद्योग, व्यवसायाला अनेक विभागाचे अनुदान घेता येऊ नये, असे धोरण आहे. पण, समूह व्यवसाय अथवा समूह प्रक्रिया व्यवसाय उभे करण्यासाठी सरकार निश्चितच धोरण निश्चित करेल. कोकणात आंबा, काजू, करवंद, फणस आदी फळांवर प्रक्रिया करणारा उद्योग उभा करण्यासाठी निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सामंत यांनी दिली.
प्लग अॅण्ड प्ले, या उद्योग विभागाच्या योजनेचा आढावा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. या धोरणाची सविस्तर माहिती केंद्र सरकारला दिली जाणार आहे. केंद्र सरकार या योजनेची अंमलबजावणी देशभरात करणार आहे, अशी माहितीही सामंत यांनी दिली.
