मुंबई : मुंबईसह राज्यातील २९ पैकी २५ महानगरपालिकांमध्ये महायुतीची सत्ता येत असल्याने हा विजय सर्व विक्रम तोडणारा आहे. एवढ्या प्रचंड विजयाचा उन्माद न करता जबाबदारीने वागावे, असा परखड सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते, पदाधिकारी आणि नवनिर्वाचित नगरसेवकांना शुक्रवारी दिला.

जनतेने मोठ्या अपेक्षा ठेवून भाजप उमेदवारांना निवडून दिले आहे. त्यामुळे त्यांनी पारदर्शी पद्धतीने व प्रामाणिकपणे काम करावे आणि जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही फडणवीस यांनी दिल्या. महापालिका निवडणुकीतील विजयाबद्दल फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री पंकजा मुंडे, आशीष शेलार, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आदींच्या उपस्थितीत भाजप प्रदेश कार्यालयापुढे जल्लोष करण्यात आला.

भाजप हिंदुत्ववादीच असून हिंदुत्व आणि विकासाला वेगळे करता येणार नाही. हिंदुत्व आमचा आत्मा असून त्यानेच आम्हाला जनतेपर्यंत पोचविले आहे. हिंदुत्व ही एक जीवनपद्धती आहे. पूजापद्धती कोणतीही असली, तरी देशाविषयी प्रेम असलेला हिंदूच असून आमचे हिंदुत्व व्यापक आहे.-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री