मुंबई: राज्यातील २९ महापालिकांसाठी गुरुवारी मतदान होत आहे. मात्र मतहक्काच्या पूर्वसंध्येला अनेक ठिकाणी मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी पैशांचा मुक्तहस्ते वापर केल्याचे प्रकार घडले. रोख रकमेबरोबरच सोने, चांदी, पैठणी यांचे आमिष दाखविण्यात आले. अगदी प्रतिस्पर्धी उमेदवारांमध्ये अनेक ठिकाणी हाणामाऱ्या झाल्या. एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीचे मतदान लोकशाहीचा उत्सव म्हणून साजरे केले जात असताना मतदानापूर्वी ‘नोटा’चा प्रभाव खुल्या प्रमाणात अनेक शहरांत आढळून आला.
ठाणे जिल्ह्यात लाखोंची रोकड जप्तठाण्यातील प्रभाग क्रमांक ३ येथे पैसेवाटपाच्या आरोपावरून दोघांना मारहाण करण्यात आली. ठाण्यातील मनोरमानगर येथे दोन तरुणांना पैसेवाटपाच्या आरोपावरून पकडण्यात आले असून त्यांच्याकडून ३६ हजार १०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. उल्हासनगर येथे ५० लाख, वाशी येथील एपीएमसी भागात १६ हजार ६०० रुपये, नेरुळ २ लाख ४१ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. कल्याण येथील कचोरे भागात ९ लाखांची तर, भिवंडीत ४ लाख ४० हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. निवडणुकांच्या काळात सर्वच नाक्यांवर पोलिसांची पथके तैनात केली जातात. यंदा मात्र पथके कमी असून, रोकडही जप्त करण्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते.
जळगावमध्ये २९ लाख रुपये, सोने, चांदी ताब्यात
जळगाव : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या चारही बाजूला स्थिर सर्वेक्षण पथके तैनात करण्यात आली आहेत. त्यापैकी एका पथकाने ममुराबाद रस्त्यावरील चौकीवर तपासणीदरम्यान एका वाहनातून २९ लाख रुपये तसेच ८० ग्रॅम सोने आणि तीन किलो चांदी जप्त करण्यात आली. मोटारीत बऱ्हाणपूर येथील राकेश श्रॉफ, जयेश श्रॉफ आणि चालक नवीन भावसार हे तिघे होते. सर्व मुद्देमाल बऱ्हाणपूर येथील एका सुवर्ण पेढीचे मालक दामोदरदास गोपालदास श्रॉफ यांच्या मालकीचा असल्याचे स्पष्ट केले. पोलिसांनी, संबंधित व्यक्तींना कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. पावत्या सादर झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
नागपूरमध्ये १५ लाखांची रोकड पकडली
नागपूर : नागपूरसह विदर्भातील चारही महापालिका क्षेत्रांत मतदारांना पैसेवाटप केले जात असल्याच्या चर्चा होत्या. मात्र नागपूर वगळता इतर ठिकाणी त्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली नाही. नागपूरमध्ये मात्र प्रभाग १४ (ड) मधील भाजप उमेदवार प्रगती पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी गिट्टीखदान परिसरात पैसेवाटप केल्याचा आरोप काँग्रेसने केला असून यासंदर्भात गिट्टीखदान पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान, नागपूरमध्येच प्रचारकाळात महापालिकेच्या वेगवेगळ्या पथकांनी रविवारपर्यंत १४.८३ लाख रुपयांची रोख जप्त केली. निवडणुकीच्या काळात पोलिसांच्या सहकार्याने महापालिकेच्या पथकाने शस्त्रसाठाही जप्त केला.
महानगरपालिकांमध्ये कोणाची बाजी?
मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत कोणता राजकीय पक्ष बाजी मारणार याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. विधानसभा आणि नगरपालिकांप्रमाणेच महानगरपालिकांमध्ये पहिला क्रमांक कायम राखण्यासाठी भाजपने सारी ताकद पणाला लावली आहे. मुंबईची प्रतिष्ठेची निवडणूक कोण जिंकणार याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई आहे. महानगरपालिकेच्या एकूण २,८६९ प्रभागांसाठी १५,९३१ उमेदवार रिंगणात आहेत.
डोंबिवलीत उमेदवारावर हल्ला
ठाणे: ठाणे जिल्ह्यात पैसेवाटप तसेच एकमेकांवर हल्ले करण्याच्या तक्रारी करण्यात आल्या. डोंबिवली येथील सुनीलनगर प्रभाग क्रमांक २९ भाजपचे उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर यांच्यावर शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटील यांनी हल्ला केला. तर, पाटील बंधू यांनीही आपल्यावर हल्ला केल्याचा दावा केला आहे.
खारघरमध्ये रोकड
पनवेल : बुधवारी सायंकाळी खारघर येथील सेक्टर २० मधील यश एव्हेन्यू या इमारतीत मतदारांना प्रलोभन देण्यासाठी आणलेली सव्वा दोन लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. नवी मुंबईतील आचारसंहिता कक्षाचे मुख सनियंत्रण अधिकारी सुनील पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक प्रचारादरम्यान आतापर्यंत पैसे वाटपाचे किंवा नागरिकांनी पैसे वाटताना पकडल्याच्या ११ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी १० तक्रारींचे निवारण केले असून, एपीएमसी येथील १६.१६ लाख रुपये आयकर विभागाकडे चौकशीसाठी दिले आहेत. तर नेरुळ येथील घटनेत २.४१ लाख जप्त करण्यात आले.
बेलापूरमध्ये २० लाख
बेलापूर परिसरातील कोकण भवन सर्कलवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी २० लाख रुपयांची रोकड वाहनातून जप्त केली. अधिकाऱ्यांनी गाडी तपासणीसाठी थांबवली असता ही रक्कम सापडली. मिळालेल्या पैशांच्या तपास सुरू असून रकमेचा स्रोत व उद्देश शोधण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.
