मुंबई: हिंदू दिनदर्शिकेनुसार पौष मास कायमच संक्रमणाचा. यंदाचा पौष नेहमीच्या उत्तरायणाखेरीज महाराष्ट्रासाठी निवडणुकीची संक्रांत घेऊन आला असून राजकारणातील सर्व अभद्र, असभ्य आणि अनिश्चिततेच्या दर्शनाने मराठी जन असाहाय्य झाल्याचे दिसते. सत्तेतील सहभागी एकमेकांचा गळा धरताना दिसतात तर विरोधी पक्षीयांत दिसणारे बघता बघता सत्ताधीशांत जाऊन बसतात. बुधवारच्या ‘लोकसत्ता लोकसंवादा’त याचे प्रतिबिंब पुरेपूर दिसते. एकनाथ शिंदे यांच्या सेनेचे नेते भाजपस ‘बघून घेऊ’ म्हणतात, उद्धव ठाकरे-सेनेच्या नेत्या भाजपवर राजकीय गुंडगिरीस उत्तेजन दिल्याचा आरोप करतात, ‘मनसे’चा नेता नगरसेवकांच्या ‘बिनविरोधी’ निवडीमागे योजना असल्याचे म्हणतो आणि कालपर्यंत भाजपला भ्रष्ट म्हणणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ‘…तरीही सत्तेचा तिळगुळ आम्हीच खाऊ’ असा आत्मविश्वास व्यक्त करतात. संक्रांतीच्या आधीचा दिवस ‘भोगी’चा. पण महाराष्ट्रात ही ‘भोगी’ आधीच सुरू झाली असून सत्तेचे वाण ‘लुटण्याची’ स्पर्धा मोठ्या जोमाने सुरू झाल्याचे दिसते.
‘भाजपइतके हीन राजकारण अशक्यच!’
पुणे : ‘राजकारणात कूटनीती असते, त्यामुळे त्यात सरळमार्ग कुठपर्यंत टिकणार हा प्रश्न असतोच. पण, सत्ताधारी भाजप आज ज्या खालच्या पातळीवर गेला आहे, तितके खाली कुणालाही जाता येणार नाही,’ अशी टिप्पणी शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यात आयोजित ‘लोकसत्ता लोकसंवाद’मध्ये बुधवारी केली.
त्या म्हणाल्या, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी बांधलेल्या सत्तेच्या वारुळात काँग्रेस, ‘राष्ट्रवादी’चे लोक, तडीपार, गुंड, बलात्कारी आले आहेत. ‘काँग्रेसमुक्त भारत’ची घोषणा करणारा भाजपच आता काँग्रेसयुक्त झाला आहे. महाराष्ट्रातील भाजप, सांस्कृतिक राजकारण नासवण्याचे पाप देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.’
‘सत्ता, विजय प्रत्येकाला हवा असतो. मात्र, त्यासाठी वाट्टेल ते करून चालत नाही. एका मताने अटलबिहारी वाजपेयी यांची सत्ता गेली होती. तत्त्वांशी तडजोड न करता, सत्ता सोडणारा तो भाजप कुठे आणि सत्तेसाठी काहीही करणारा आत्ताचा भाजप कुठे,’ अशी टीकाही त्यांनी केली. अंधारे म्हणाल्या, ‘सध्याची परिस्थिती पाहून आपण अशक्याच्या गर्तेत अडकत चाललो आहोत का, असे वाटते. सत्ता, संपत्ती यापेक्षा कल्याणकारी राज्य ही राज्यकर्त्यांची प्राथमिकता असली पाहिजे. पण, कल्याणकारी राज्याची संकल्पना आता दूरदूरपर्यंत दिसत नाही. सध्या सोयीस्करवाद्यांचे राज्य आहे. त्याविरोधात आम्ही लढत आहोत.’
‘लोकसभा, विधानसभा, नगरपालिका आणि आता महापालिका, प्रत्येक वेळी आम्ही जोमाने मशाल घेऊन उभे राहात आहोत,’ असेही त्या म्हणाल्या.
‘बिनविरोध निवड हा मोठा राजकीय कट!’
ठाणे : महापालिका निवडणुकीत विरोधक हे दुबार मतदार, बोगस मतदार याद्यांविषयी सातत्याने ओरड करत राहिले. दुबार आणि बोगस मतदारांमार्फत निवडणुका जिंकण्याचा डाव असतानाच भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आखलेले ‘ऑपरेशन बिनविरोध’ हा व्यापक राजकीय कटाचा भाग होता, असा आरोप मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केला. पैसा, दडपशाही आणि जमेल तितका यंत्रणांचा वापर हीच या निवडणुकांची ओळख ठरते की काय, अशी भीती व्यक्त करत यातून जनतेने बोध घ्यावा आणि मतदान करावे, असे आवाहनही अविनाश जाधव यांनी केले.
पालिका निवडणुका जाहीर होण्याआधी मनसेसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी बोगस मतदारांबाबत एक चळवळ उभारण्याचा प्रयत्न केला, असे जाधव म्हणाले.
‘१६ तारखेला एकत्र बसून तोंड गोड करू’
मुंबई : निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीत परस्परांवर होणारे आरोप – प्रत्यारोप, निर्माण झालेली कटुता चुकीची आहे. कल्याण – डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात उद्विग्न होऊन मागे एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. पुढे नंतर सारे चित्र बदलले. आताही १६ जानेवारीला एकत्र बसून तिळगूळ भरवू व तोंड गोड करू, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी बुधवारी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला.
‘भाजपला जागा दाखवू’
ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवून शिवसेनेचा सन्मान केला. आम्ही या उपकाराची जाणीव ठेवणारे आहोत. त्याबद्दल त्यांचे कृतज्ञही आहोत. मात्र भाजपचे स्थानिक नेते अहंकारापोटी आमच्या गळ्याला हात घालणार असतील तर त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात दिला.
देशाचे राजकारण आता युती आघाड्यांशिवाय शक्य नाही याची जाणीव भाजपलाही झाली आहे. त्यामुळे कितीही ‘शत प्रतिशत’चा नारा दिला तरी युतीशिवाय त्यांनाही पर्याय नाही, असेही सरनाईक यावेळी म्हणाले.
