Maharashtra Dahi Handi Celebration Updates, 27 August 2024 : कृष्णजन्माष्टमी नंतर आज राज्यात दहीहंडीचा उत्साह बघायला मिळतो आहे. त्यासाठी गोविंदा पथक सज्ज झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे आज मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे भरपावसात दहीहंडीचा थरार बघायल मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय काल मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावरून राज्यातील राजकीय वातावरणही तापलं आहे. यासह इतर घडामोडींकडेही आपलं लक्ष राहणार आहे.
Maharashtra News Today, 27 August 2024 : मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईत मुसळधार पावासाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
अडीच वर्षांपुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्ही पापाची हंडी फोडून राज्यात एक पुण्याची हंडी उभारली, अशी टिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी ठाण्यातील दहीहंडी उत्सवात बोलताना विरोधकांवर केली.
राजस्थानच्या प्रेमीयुगुलचे लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून मित्रांने अपहरण केले. फार्महाऊसवर डांबून मारहाण करीत १२ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार नागपूरात घडला आहे.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये परीक्षा विभागातील गोंधळ, प्राध्यापक नियुक्तीसाठी गैरप्रकाराचे आरोप, आमदार प्रवीण दटके यांची अधिसभेवर अवैध नियुक्तीचा आरोप, एमकेसील आणि प्रोमार्क कंपनीवरील आरोपांवरून भाजयुमो आणि शिक्षण मंचामध्ये सुरू असलेल्या वादात आता ‘एनएसयूआय’नेही उडी घेतली आहे.
नागपूर शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या पदभरती परिक्षा दरम्यान महिलांनी गोंधळ घालत परीक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
पुण्यात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पुण्यातील हडपसर भागात इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेणार्या मुलीचा शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
सावंतवाडी: मुंबईतील गिरणी बंद होवून जवळपास ४२ वर्ष उलटून गेली. सरकारने घरं देणार म्हणून घोषणा, निर्णय घेतला आहे. मात्र कामगारांना घरे बांधून देण्याबाबत सरकार टोलवाटोलवी करत असल्याने हयातीत घरे मिळण्याची शक्यता कमीच आहे.
मुंबई : एका उच्चशिक्षित बेरोजगार तरुणाने समाजमाध्यमांवर दुचाकी चोरीचे धडे घेऊन दोन दुचाकी चोरल्याचा प्रकार भांडुप येथे उघडकीस आला. या आरोपीला भांडुप पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी अटक केली असून त्याने चोरलेल्या दोन दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या.
मुंबई : दिल्लीतील पालिका बाजारच्या धर्तीवर मुंबईत दोन ठिकाणी भूमिगत बाजार सुरू करण्याची घोषणा करूनही त्याची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिला. भूमिगत बाजार सुरू करून त्यात फेरीवाल्यांना जागा देण्याचे ठरवण्यात आले होते.
ठाणे : विरोधकांनी किती टीका केली तरी तुमच्या बळावर काम करतच राहणार असल्याचे सांगत आगामी विधानसभेची दहीहंडी महायुतीच फोडणार आहे, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभीनाक्यावरील दहीहंडी उत्सवात बोलताना केला.
पुणे : कौटुंबिक वादात पक्षकारांमधील कटूता कमी करुन त्यांच्यात पुन्हा नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी कौटुंबिक न्यायालायात सुकून योजना सुरू करण्यात आली आहे. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने ही योजना सुरू केली असून, पुणे जिल्ह्यातील विविध न्यायालयांत प्रलंबित असलेली कौटुंबिक वादाची सर्व प्रकरण सुकून केंद्राकडे सोपविण्यात येणार आहेत.महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई उच्च न्यायालय आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्थेकडून सुकून योजना सुरू करण्यात आली आहे.
प्रभू श्रीकृष्णाने आपल्याला जी हंडी दिली आहे, ती प्रेमाची हंडी आहे. हंडी कुणीही फोडली, तरी यातील काला सर्वांसाठी आहे. तो काला सर्वांनी वाटून खायचा आहे. मी सर्वांना दहीहंडीच्या शुभेच्छा देतो, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुंबई : ‘गोविंदा रे गोपाळा...’, ‘बोल बजरंग बली की जय’ असा जयघोष करीत मुंबईसह राज्यभर दहीहंडी उत्सवाचा उत्साह द्विगुणीत होत असतानाच मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. जलधारा अंगावर झेलत आणि मैदानातील चिखलाची पर्वा न करता गोविंदा पथकांतील गोविंदा उंचच मानवी मनोरे रचण्यात मग्न होते.
गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. यातच आज हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांची बैठक पार पडली आहे. यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "मी निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे", असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे.
मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने मंगळवारी सकाळपासून गोविंदा पथके मानाची दहीहंडी फोडत मार्गस्थ होऊ लागली असून निरनिराळ्या पथकांतील गोविंदांनी परिधान केलेल्या टी-शर्टवर दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या राजकीय नेत्यांची छबी झळकत होती. सर्वच राजकीय पक्षांतील आजी, माजी, भावी, इच्छुक लोकप्रतिनिधींची नावे झळकत होती.
मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावरून त्यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीकाही केली.
https://twitter.com/yadavakhilesh/status/1828104107812688024
पुणे : खराडीतील नदीपात्रात तरुणीचा मृतदेह सापडला. तरुणीचे शिर धडावेगळे करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, आरोपीचा शोध चंदननगर पोलिसांकडून घेण्यात येत आहे. खून झालेल्या तरुणीची ओळख पटलेली नाही.
मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.
नेपाळ बस दुर्घटनेतील जखमींची आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली.
मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट आक्रमक झाला असून उद्या ते सिंधुदुर्ग येथे निषेध आंदोलन करणार आहेत.
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात गेल्या तीन दिवसांपासून बलुची बंडखोर आणि अतिरेक्यांकडून सामान्य नागरिक, सुरक्षा जवान लक्ष्य करण्यात येत आहे. तीन दिवसांत अतिरेक्यांच्या हल्ल्यात ७५ पेक्षा जास्त नागरिकांना प्राण गमवावे लागले. अतिरेक्यांकडून रक्तरंजित हल्ले का केले जात आहेत, त्यांच्या मागण्या काय, पाकिस्तान सरकार या हल्ल्यांपुढे वारंवार हतबल कसे ठरते, याचा आढावा…
नवी मुंबई : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीच्या मानेवर कोयत्याने वार केल्याची घटना तुर्भे गावात घडली. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. घटना घडल्यावर जखमी महिलेच्या मुलाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
नवी मुंबई : भर पावसात रेल्वे रुळावर जाऊन पावसाचा आनंद घेणे दोन अल्पवयीन युवक-युवतीला महागात पडले. युवतीचा रेल्वेची धडक लागून मृत्यू झाला तर युवकाचा हात फ्रॅक्चर झाला आहे.
शनिवारी रात्री सीबीडी परिसरात जोरदार पाऊस सुरू होता. याच वेळेस नेरुळ उरण रेल्वे मार्गावर उलवा सेक्टर २१ येथील जाणाऱ्या रेल्वे रुळावर युवक-युवती पावसाचा आनंद घेत होते. याच वेळेस साडेनऊ ते पावणेदहाच्या दरम्यान कोपर स्थानकातून सुटलेली लोकल नेरुळच्या दिशेने येत होती. दोघे जण रुळांवर दिसताच मोटरमनने वारंवार हार्न वाजवला. मात्र त्याकडे दोघांचे लक्ष नव्हते. जेव्हा लक्षात आले त्यावेळी लोकल जवळ आली होती. त्यातील युवकाने रुळावरून उडी मारली, मात्र युवतीला काही कळण्याच्या आत अपघात झाला.
मुंबई : बदलापूर येथे उसळलेल्या जनक्षोभाचे वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराशी अर्वाच्य भाषेत संभाषण करून विनयभंग केल्याचा आरोप असलेले माजी नगरसेवक वामन म्हात्रे यांच्या अटकपूर्व जामिनावर २९ ऑगस्ट रोजी तातडीने सुनावणी घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी कल्याण सत्र न्यायालयाला दिले.
मुंबई : राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना माता आरोग्य, बाल आरोग्य, कुटुंब नियोजन इत्यादीसाठी नियमित गृहभेटी देणे, माता व बालकांना मार्गदर्शन करणे, रुग्णांना रुग्णालयात पाठवणे अशी कामे करावी लागतात. ही कामे करण्यासाठी त्यांना गावोगावी फिरावे लागते. यादरम्यान त्यांचा अपघात झाल्यास त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी राज्य सरकारने त्यांच्यासाठी विमा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पनवेल : सिडको महामंडळाने बांधलेल्या अनेक प्रकल्पांमधील मालमत्ता अद्याप विक्रीविना उपलब्ध असल्याने सिडकोच्या संपत्तीमध्ये वाढ होण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पहिले उड्डाण होण्यापूर्वी सिडको मंडळ त्यांच्या अनेक मालमत्ता सोडतीमध्ये विक्री करत आहे.
उलवे उपनगरातील बामणडोंगरी रेल्वेस्थानकापासून हाकेच्या अंतरावरील सेक्टर ६ येथील भूखंड क्रमांक २ वरील सिडकोने बांधलेल्या बामनडोंगरी गृहसंकुलांतील २४३ पैकी १०० उपलब्ध दुकानांच्या विक्रीच्या योजनेसाठी इच्छुक गुंतवणूकदार ३० ऑगस्टला सोडतीमध्ये ऑनलाइन अर्ज नोंदवू शकतील.
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांच्या सोडतीसाठीच्या सोडतपूर्व प्रक्रियेला अर्थात अर्जविक्री-स्वीकृतीला अद्यापही म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. ११७ दिवसांमध्ये केवळ १४ हजार ८३९ अर्ज अनामत रक्कमेसह सादर झाले आहेत. हा प्रतिसाद पाहता सोडतपूर्व प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ देण्याचा मंडळाचा विचार आहे.
मुंबई : राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना माता आरोग्य, बाल आरोग्य, कुटुंब नियोजन इत्यादीसाठी नियमित गृहभेटी देणे, माता व बालकांना मार्गदर्शन करणे, रुग्णांना रुग्णालयात पाठवणे अशी कामे करावी लागतात. ही कामे करण्यासाठी त्यांना गावोगावी फिरावे लागते. यादरम्यान त्यांचा अपघात झाल्यास त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी राज्य सरकारने त्यांच्यासाठी विमा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
Sanjay Gaikwad : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांनंतर राज्यातील इतर भागातून अशाच प्रकराची प्रकरणं पुढे येईल लागली आहे. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जातो आहे. याप्रकरणातील आरोपींना तत्काळ फाशी द्या, अशी मागणी पुढे येईल लागली आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरणही तापलं आहे. राज्य सरकार कायदा सुव्यवस्था सांभाळण्यात अपयशी ठरलं असून आरोपींना कायद्याचा धाक उरला नाही असा आरोप विरोधकांकडून केला जातो आहे.
( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडतो आहे. अशाच आज मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.