मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील परिचारिकांनी सेवा प्रवेश नियम, सुधारित आकृतिबंध, पदोन्नती प्रक्रिया आणि रिक्त पदांची भरती तातडीने पूर्ण करण्याच्या मागणीसाठी आज (४ ऑगस्ट) रोजी सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत राज्यभर दोन तास कामबंद आंदोलन आणि जिल्हास्तरीय तीव्र निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, शासनाने १५० दिवसांत सेवाविषयक प्रलंबित बाबी निकाली काढण्याची घोषणा केली होती. मात्र, मुदत संपूनही सेवा प्रवेश नियम, सुधारित आकृतिबंध, पदोन्नती आणि भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे हजारो परिचारिका पदोन्नतीपासून वंचित राहिल्या असून रिक्त पदांमुळे विद्यमान कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढून त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होत असल्याचा संघटनेचा आरोप आहे.

मुख्य मागण्या :

  • सुधारित सेवा प्रवेश नियम तातडीने अंतिम करावेत.
  • सुधारित आकृतिबंधाला शासनाची मंजुरी द्यावी.
  • सर्व प्रलंबित पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करावी.
  • रिक्त पदांवरील सरळ सेवा भरती त्वरित सुरू करावी.
  • परिचारिका संवर्गाशी संबंधित सर्व प्रलंबित सेवाविषयक प्रश्नांवर कालबद्ध निर्णय घ्यावा.