मुंबई : राज्यात गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी राज्यभरातील सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येत आहे. याअंतर्गत पोलिसांची सीसीटीव्हीची ‘महानेत्रम’ प्रणाली विकसित करण्यात आली असून आता याअंतर्गत रस्त्यांवर दुकानदार तसेच अन्य संस्थांनी लावलेल्या खासगी सीसीटीव्हींचाही आधार घेतला जाणार आहे. या सीसीटीव्हीची नोंद आता या ‘महानेत्रम’ प्रणालीत घेतली जाणार आहे.
पोलिसांकडील सीसीटिव्ही नेटवर्क अधिक सक्षम करण्यात येत आहे. १ लाख ८२ हजार ३६२ गुन्हयांच्या शोधात सीसीटिव्हीने फायदा झाला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आपण “महानेत्रम” ही सीसीटिव्ही प्रणाली विकसित करत आहोत. यात फेस रिकग्निशन आदींचा समावेश असेल. पोलिसांच्या नेटवर्कसोबतच खासगी सीसीटिव्ही पण जे केवळ सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आले आहेत अशांचाही या फिडमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न असणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दिलेल्या माहितीत स्पष्ट केले.
सायबर गुन्हेगारांकडून केवळ १२ टक्केच रकमेची वसुली
सायबर गुन्हेगारीमध्ये तपासाची प्रक्रिया अधिक सक्षम करण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. २०२५ मध्ये जे नुकसान यातून झाले त्यातील १० ते १२ टक्केच रक्कम आपण रिकव्हर करू शकलो. कारण ही रक्कम वेगवेगळया देशात निघून गेली ज्यांच्याशी आपला व्यवहार नाही. यात जाणीवजागृतीची आवश्यकता आहे. अत्याधुनिक साधने आपण परदेशातून आणली आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाने जगातील टॉप प्रोजेक्टचा बहुमान आपल्या सायबर क्राईम विभागाला दिला आहे. सायबर क्राईम झाल्यास तातडीने १०४५ या क्रमांकावर संपर्क करावा लगेचच कारवाई होईल असे त्यांनी सांगितले.
