अत्याधुनिक रायफल एके-४७ च्या चाचणीत अपयशी ठरल्याने १४३० बुलेटप्रुफ जॅकेट्स महाराष्ट्र पोलिसांकडून संबंधीत कंपनीला परत करण्यात आली आहेत. मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यानंतर नऊ वर्षांच्या काळात कानपूर येथील जॅकेट बनवणाऱ्या कंपनीकडून ४६०० बुलेटप्रुफ जॅकेट्स मागवण्यात आली होती. अतिरिक्त पोलीस महासंचालक (खरेदी आणि समन्वय) व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी ही माहिती दिली आहे.

पोलीस विभागाने ५००० बुलेटप्रूफ जॅकेट्सची मागणी संबंधीत कंपनीकडे केली होती. मात्र, कस्टम ड्युटी आणि इतर चार्जेस जाऊन यांपैकी ४६०० जॅकेट्स प्रत्यक्ष त्यांना मिळाली होती, यासाठी १७ कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. याच कंपनीकडून अशीच जॅकेट्स इतर केंद्रीय सुरक्षा बलांसाठी देखील तयार केली जातात.

महाराष्ट्र पोलिसांना मिळालेली ही जॅकेट्स चंदीगडच्या केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. यांपैकी केवळ ३००० जॅकेट्स चाचणीत पास झाली आहेत. तर उर्वरित १४३० जॅकेट्स परत पाठवण्यात आली आहेत. चाचणीदरम्यान, या जॅकेट्समधून एके ४७ रायफलच्या गोळ्या आरपार गेल्या होत्या.

चाचण्यांमध्ये नापास झालेली ही १४३० जॅकेट्स ताज्या मालाबरोबर बदलून देण्यात यावी असा प्रस्ताव जॅकेट निर्मिती कंपनीकडे पाठवण्यात आला आहे. या बुलेटप्रुफ जॅकेट्सचा दर्जा आणि मानकांमध्ये कुठलीही तडजोड केली जाऊ शकत नाही. त्यामुळे परत पाठवण्यात आलेल्या जॅकेट्सच्या पुन्हा चाचण्या करुन आम्ही ते परत घेण्यास तयार आहोत, असे मुंबई पोलिसांच्या संबंधीत अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

२००८ मध्ये झालेल्या मुंबईवरील हल्ल्यावेळी दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांचा बुलेटप्रुफ जॅकेट घातलेले असतानाही मृत्यू झाला होता. त्यांचा जॅकेट घातल्याचा शेवटचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला होता.