हैदराबादमध्ये पुढील महिन्यात राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार असून त्यासाठी राज्यातील कोअर कमिटीची आज बैठक होणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सागर बंगल्यावर कोणत्याही बैठका होत नाही. भाजपाचं कार्यालय बैठकांचं केंद्र असतं. लोक त्यांना भेटायला जात आहेत अशी माहिती दिली.

शिवसेनेतील बंड हा त्यांचा अंतर्गत, खासगी प्रश्न आहे त्यामुळे त्यावर काही बोलणार नाही असं सांगत चंद्रकांत पाटील यांनी जास्त भाष्य करणं टाळलं. त्यांनी काय करावं, बंडखोरांनी काय करावं यामध्ये काही मध्यस्थी करणार नाही असं त्यांनी सांगितलं. तसंच भाजपावर होणाऱ्या आरोपाबद्दल विचारलं असता ते काहीही म्हणू शकतात असं म्हटलं.

Maharashtra Political Crisis: भाजपाचा ठाकरे सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव? कोअर कमिटीची पाच वाजता बैठक; जाणून घ्या प्रत्येक अपडेट

देवेंद्र फडणवीस यांनी मौन बाळगलं असल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “मौन बाळगण्याचा काही प्रश्न नाही. काही बोलण्यासारखं नसेल म्हणून ते बोलत नसतील”. एकनाथ शिंदे यांच्याकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं त्यांनी सांगितलं.

“सुरक्षा पुरवणं ही केंद्राची जबाबदारी आहे. राज्य जेव्हा सुरक्षा देण्यास कमी पडतं तेव्हा स्वाभाविकपणे आपण केंद्राकडे मागणी करतो,” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. तसंच एकनाथ शिंदे यांनी कोणत्या राष्ट्रीय पक्षाचा उल्लेख केला याची माहिती नाही असंही ते म्हणाले,

“ईडी, सीबीआय, प्राप्तिकर विभाग या स्वायत्त संस्था आहेत. त्यावर कोणी काही बोलायची गरज नाही. संजय राऊत काहीही बोलू शकतात,” असं त्यांनी संजय राऊतांनी ईडीच्या नोटीशीनंतर केलेल्या वक्तव्यावर बोलताना म्हटलं.