शिवसेना आमदार महाराष्ट्रातून बाहेर गेले तेव्हा गुप्तचर विभागाला याची माहिती न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्रालयाकडे नाराजी जाहीर केली आहे. शरद पवारांनी सिल्व्हर ओकवर झालेल्या पक्षाच्या बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून स्पष्ट मत नोंदवलं आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवारे बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Maharashtra Political Crisis: “शिवसेनेत जेव्हा जेव्हा बंड झालं तेव्हा…,” अजित पवारांनी सांगितला इतिहास

यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शेवटच्या क्षणापर्यंत सरकारचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंच्या पाठीशी राहील असा निर्णय घेण्यात आला. यानंतर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Maharashtra Political Crisis Live : हा प्रयोग फसला म्हणणं म्हणजे राजकीय अज्ञान- शरद पवार; वाचा प्रत्येक अपडेट…

अजित पवारांना प्रसारमाध्यमांनी शिवसेना आमदार महाराष्ट्राबाहेर गेले हे गृहमंत्रालयाचं अपयश आहे का? असं विचारलं असता ते म्हणाले की, “गृहमंत्रालयाच्या संबंधित अधिकाऱ्याचं हे काम असून त्यांना याची माहिती हवीच होती. आमदार, मंत्री, नेते ज्यांना पोलिसांची सुरक्षा आहे ते जेव्हा बाहेर जातात, तेव्हा त्यांना सुरक्षा देणारे काय करतात? गृहमंत्रालयातील ज्या अधिकाऱ्यावर याची जबाबदारी आहे ते काय करत होते ही विचार करण्याची गोष्ट आहे”.

“शिवसेनेत जेव्हा जेव्हा बंड झालं तेव्हा नेते एकटे पडले”

“शिवसेनेत जेव्हा जेव्हा अशा प्रकारचं बंड झालं त्यावेळी नेते एका बाजूला गेले, शिवसैनिक त्यांच्या मागे गेले नाहीत. मी राजकारणात आल्यानंतर हे शिवसेनेतील तिसरं बंड आहे. मी छगन भुजबळ, नारायण राणे, एकनाथ शिंदे यांचं बंड पाहिलं. हे सर्व पाहिलं तर बंड करणारी प्रमुख व्यक्ती टिकते, पण नंतर इतर सहकारी निवडूनही येऊ शकत नाहीत इतकं शिवसैनिक कष्ट घेतात. शिवसैनिक त्यांचा पराभव करण्यासाठी जीवाचं रान करतात असा मागील अनुभव आहे,” याची आठवण अजित पवारांनी करुन दिली.

यावेळी अजित पवारांसमोर राज ठाकरेंच्या बंडाचा उल्लेख केला असता ते त्यांच्या घरातील प्रकरण होतं असं ते म्हणाले. दरम्यान यावेळी अजित पवारांना हा शिवसेनेचा महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा डाव आहे का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “मी अडीच वर्ष उद्धव ठाकरेंसोबत जे काम केलं आहे, ते पाहता त्यांचा स्वभाव नाही. ते मोकळेपणाने मला असं करायचं आहे सांगतात”.

“आम्ही आघाडीला पाठिंबा दिला आहे. आम्ही पाठिंबा काढणार नाही. मुख्यमंत्रीपदालाही पाठिंबा दिला असून शेवटपर्यंत साथ देणार आहोत,” असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra political crisis ncp ajit pawar shivsena eknath shinde rebel home ministry sgy
First published on: 23-06-2022 at 20:03 IST