मुंबई: देशात मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे ही महागाई वाढल्याचे सांगितले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेवणात तेल कमी वापरा म्हणून सांगितले मात्र आमच्या खासदारांना पळवण्यासाठी किती खाजगी विमाने वापरली जात आहेत. इंधनाचा त्यावेळी ऱ्हास झाला नाही का? असा इंधनाचा गैरवापर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान केला गेला आहे. पुण्यात दारू पिऊन अनेक लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशात सध्या “क्या रे xxx सरकार तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल” (पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात विरोधकांनी अशी घोषणा दिली होती. त्याचा संदर्भ देऊन परब यांनी हे वाक्य उच्चारताच सत्ताधारी बाकांवरून इंदिरा सरकार असा आवाज आला, तेव्हा परब यांनी आता त्या ठिकाणी नरेंद्र मोदी की देवाभाऊ असे नाव टाकावे लागेल असे म्हटले) अशी स्थिती निर्माण झाल्याचा हल्लाबोल शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार ॲड अनिल परब यांनी विधान परिषदेत केला.

विधान परिषद नियम क्रमांक २६० नवीन आज सरकारला धारेवर धरले. राज्यातील बहिणींना दीड हजार रुपये दिले की महागाईचा प्रश्न सुटला असे सरकारला वाटते. बहिणींनी सरकारला प्रश्न विचारायचा नाही. सरकार लोकांना फसवू शकत नाही. लोकांना घर चालवणे मुश्किल झाले आहे.कामगारांचा पगार वाढलेला नाही. सरकार बेफिकरपणे वागत त्याला कारणीभूत या सरकारला मिळालेलं राक्षसी बहुमत आहे. त्यामुळे आपलं कोणी वाकड करू शकत नाही. अशी भावना वाढीस लागली आहे. दारू पिऊन लोक मरत आहेत तर मरू दे, महागाई वाढत आहे तर वाढू दे, गटारात लोक पडत आहेत तर पडू दे, आम्हाला कोणीच प्रश्न विचारू शकत नाही. राक्षसी बहुमताच्या जोरावर सरकार माजुर्डे झाले आहे. आम्ही करतो ते सर्व चांगले आहे. अशी धारणा सरकार मधील लोकांची झाली आहे. अशी टीका परब यांनी केली.