मुंबई : राज्य सरकारकडून कौशल्य शिक्षणाला प्रोत्साहन दिले जात असताना कौशल्य शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या आयटीआयच्या अभ्यासक्रमांना तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमाच्या तुलनेत विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत ८९ हजार ६३१ विद्यार्थ्यांना जागांचे वाटप झाले. त्यापैकी ५८ हजार ३६५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. याउलट आयटीआयच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरही फक्त ६२ हजार ७६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.

यंदा राज्यातील ४४२ तंत्रनिकेतनांमधील १ लाख ३७ हजार ६२७ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. अंतिम गुणवत्ता यादीत १ लाख ४० हजार ३७१ विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला, तर १ लाख २१ हजार ८३१ विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीसाठी पर्याय अर्ज भरले. पहिल्याच फेरीत ८९ हजार ६३१ विद्यार्थ्यांना जागा मिळाल्या असून, त्यापैकी तब्बल ४९ हजार ६७८ विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रथम पसंतीच्या संस्थेत प्रवेशाची संधी मिळाली. १८ जुलैपर्यंत ५८ हजार ३६५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे सुमारे ८७ टक्के आहे.

राज्यातील ४१८ शासकीय आणि ५८६ खासगी अशा एकूण १ हजार ४ आयटीआय संस्थांमधील १ लाख ४५ हजार १२४ जागांसाठी यंदाची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली आहे. आयटीआयच्या आतापर्यंत दोन फेऱ्या पार पडल्या. आयटीआयच्या पहिल्या फेरीत ७८ हजार ४९६ जागांचे वाटप होऊन ४१ हजार ८२५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, तर दुसऱ्या फेरीत ४४ हजार ६८० जागांचे वाटप होऊन १९ हजार ७८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. या दोन फेऱ्यांमध्ये ६२ हजार ७६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. परिणामी तब्बल ८३ हजार ४८ जागा रिक्त असून एकूण प्रवेशाची टक्केवारी केवळ ४२.७७ टक्क्यांवर आहे. अशा प्रकारे दोन फेऱ्यांनंतरही एकूण प्रवेशाची संख्या डिप्लोमाच्या पहिल्याच फेरीतील प्रवेशाच्या जवळपास राहिली आहे.

उच्च शिक्षणाच्या वाढत्या संधी, पदवी अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा वाढलेला कल, तसेच तंत्रनिकेतन पदविकानंतर थेट पदवी अभ्यासक्रमात प्रवेशाची उपलब्ध असलेली संधी यामुळे पदविका अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा कायम आहे. दुसरीकडे, आयटीआयमध्ये मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहत असल्याने कौशल्याधारित शिक्षण अधिक आकर्षक करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.