मुंबई : विविध मागण्यांसाठी राज्यातील विद्यार्थी, शेतकरी, आदिवासी आणि सामाजिक संघटनांनी विविध ठिकाणी आंदोलने केली आहेत अथवा सुरु आहेत. पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. मुंबईत भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (आयआयटी) विद्यार्थींनी, नाशिकहून आलेल्या आदिवासी संघटना दादर मध्ये धडकल्या आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, संभाजीनगर, नाशिक या शहरात विविध मागण्यांसाठी आंदोलने सुरु असल्याने राज्य आंदोलनमय झाले आहे.

पुण्यातील एमपीएससी परिक्षार्थी विद्यार्थांचे आंदोलन तीव्र झाले आहे. मुंबईत भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (आयआयटी) विद्यार्थ्यांनी शैक्षणिक आणि प्रशासकीय प्रश्नांवर आंदोलन केले आहे. शुल्कवाढ, वसतिगृह सुविधा, शैक्षणिक धोरणे आणि विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व याबाबत प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. प्रशासन आणि विद्यार्थ्यांमध्ये या विषयांवर चर्चा सुरू आहे.

दादर परिसरात आदिवासी विद्यार्थी आणि त्यांच्या संघटनांनी शिक्षण, शिष्यवृत्ती, वसतिगृह सुविधा आणि सरकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी आंदोलन केले. शिष्यवृत्ती वितरणातील विलंब आणि शैक्षणिक सुविधांशी संबंधित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे संघटनांनी सांगितले. मागण्यांवर निर्णय न झाल्यास पुढील आंदोलनाची भूमिका जाहीर केली जाईल, असा इशारा संघटनांनी दिला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावाविरोधात शेतकरी आणि स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. प्रस्तावित जमीन संपादनामुळे शेती, घरे आणि पर्यावरणावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. काही ग्रामसभांनी विरोधाचे ठराव मंजूर केले आहेत. पुढील आंदोलनाबाबत स्थानिक पातळीवर चर्चा सुरू आहे.

मराठवाड्यात पाणीप्रश्न, विदर्भात शेतमालाला हमीभाव आणि कर्जमाफी, उत्तर महाराष्ट्रात कांदा उत्पादकांच्या मागण्यांसाठी आंदोलने सुरू आहेत. काही ठिकाणी बेरोजगार युवकांनी सरकारी भरतीतील रिक्त पदे भरण्याची मागणी केली आहे. अंगणवाडी कर्मचारी, आशा सेविका, कंत्राटी कर्मचारी आणि शिक्षक संघटनांनीही विविध मागण्यांसाठी आंदोलने सुरु आहेत. केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातही काही ठिकाणी आंदोलने होत आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी विविध प्रकारची आंदोलने सुरु असल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे.