मुंबई : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीशी संबंधित कर्तव्यावर पाठवताना पालिका प्रशसनाने माणूसकी हरवू नये, अशी सूचना महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेने केली आहे. अपंग, गर्भवती, स्तनपान करणाऱ्या महिला, तसेच गंभीर आजार असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणूक कर्तव्यातून वगळावे, तसेच निवडणूक कर्तव्यावर असलेल्या शिक्षकांनाही टपाली मतदान करण्याचा अधिकार द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी मुंबई महापालिकेला सुमारे ६५ हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता लागणार आहे. याकरीता आतापासून विविध विभागातून कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही निवडणुकीचे काम देण्यात आले आहे. याबाबत महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. निवडणुकीची कामे देताना प्रशासनाची संवेदनशीलता व नियोजनाचा अभाव दिसून येत असून शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होत असल्याचे मत महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेने व्यक्त केले आहे.

अपंग, गर्भवती, स्तनपान करणाऱ्या महिला, तसेच गंभीर आजार असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणूक कर्तव्यातून तातडीने व पूर्णतः वगळण्यात यावे. महानगरपालिकेकडे मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय कर्मचारी उपलब्ध असताना संवेदनशील घटकांतील कर्मचाऱ्यांवर निवडणूक कामाचा ताण टाकू नये, अशी मागणी संघटनेने केली आहे.

तसेच नाताळच्या सुट्टीच्या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या निवडणूक प्रशिक्षणाबाबतही संघटनेने नाराजी व्यक्त केली. या काळात प्रशिक्षणाची सक्ती शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी गैरसोयीची ठरते. त्यामुळे हे प्रशिक्षण जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.

टपाली मतदानाचा अधिकार हवा

निवडणूक कर्तव्यावर असलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मतदानाचा लोकशाही हक्क अबाधित राहावा, यासाठी टपाली मतदानाची (फॉर्म १२) मतदानाची संधी द्यावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे. निवडणुकीच्या कर्तव्यामुळे कोणताही कर्मचारी मतदानापासून वंचित राहू नये, ही निवडणूक प्रशासनाची जबाबदारी आहे, असे मत संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे यांनी व्यक्त केले.