मुंबई: राज्याला तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रस्थानी नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. राज्याच्या पहिल्या ‘महाराष्ट्र क्वांटम धोरण’ आणि ‘महाराष्ट्र डीप टेक धोरण यांना मान्यता दिली. संपूर्ण डीप टेक परिसंस्थेसाठी व्यापक धोरण राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी या धोरणांसंदर्भात बैठक झाली. राज्यात संशोधन, नवोन्मेष, गुंतवणूक आणि उच्च कौशल्याधारित रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी ही दोन्ही धोरणे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

राज्याला जागतिक तंत्रज्ञान केंद्र म्हणून विकसित करण्याच्या शासनाच्या व्यापक दृष्टिकोनाचा हा भाग आहे. या दोन्ही धोरणांच्या अंमलबजावणीमुळे राज्यात उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक, संशोधन, नवोन्मेष आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

या बैठकीला माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार, संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत या दोन्ही धोरणांना अंतिम मंजुरी दिली जाणार आहे.