मुंबई : सिंचनासाठीच्या पाण्याचा मोठा तुटवडा, खलावलेली पाणी पातळी, रब्बी हंगामासाठी धरणांतून आवर्तने न सोडण्याची सरकारची भूमिका आदी कारणांमुळे रब्बी पेरण्यांवर परिणाम झाला आहे. यंदा रब्बीतील पेरण्या संथगतीने सुरू आहेत. राज्यात तीन नोव्हेंबरपर्यंत जेमतेम १२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. पावसाचा, पाण्याचा अंदाज घेऊन डिसेंबरअखेरपर्यंत पेरण्या होण्याची शक्यता आहे.
राज्यात रब्बी हंगामात उसाचे क्षेत्र वगळून सरासरी ५७.८० लाख हेक्टरवर पेरणी होते. यंदा १२ टक्के म्हणजे ६.७६ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरणी ज्वारीची झाली आहे. ज्वारीचे सरासरी क्षेत्र १४.९५ लाख हेक्टर आहे, त्यापैकी २ लाख ७६ हजार १२९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. हंगामात ज्वारीची सर्वांधिक १८ टक्के पेरा झाला आहे. गव्हू लागवडीचे क्षेत्र ११.८० लाख हेक्टर असून, पेरणी तीन टक्के म्हणजे, ३५ हजार ४६१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मक्याचे क्षेत्र ३.७५ लाख हेक्टर असून, १९ टक्क्यांवर म्हणजे ७० हजार ३४६ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
बाजरी, ओट, बार्लीसह अन्य तृणधान्यांचे क्षेत्र १४ हजार हेक्टर असून, १० टक्के म्हणजे हजार ४९७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. हरभरा क्षेत्र २५.१६ लाख हेक्टर असून, ११ टक्क्यांवर, २ लाख ८० हजार ८५३ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. करडईची ६ हजार ९२८ हेक्टर, जवस १५१ हेक्टरवर, तीळ ५६ हेक्टर, सूर्यफूल १७३ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
पाण्याच्या टंचाईमुळे ज्वारी, हरभऱ्याला प्राधान्य
यंदा रब्बी हंगामातील पिके निघतील इतकी पाण्याची उपलब्धता राज्यात नाही. त्यामुळे जास्त पाणी लागणारी गव्हू, ऊस आदी पिकांची लागवड होताना दिसत नाही. पाण्याची उपलब्धता असेल तर काही प्रमाणात गव्हू लागवड होत आहे. पण, टंचाईची भीती असल्यामुळे शेतकरी ज्वारी, मका आणि हरभरा लागवडीकडे वळले आहेत. मका आणि ज्वारी पिकाला आली नाही तरी जनावरांना चारा होईल, या आशेने शेतकऱ्यांनी लागवडीला प्राधान्य दिले आहे. सरकारकडून चारा पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे.
चारा पिकांना प्राधान्य द्या – कृषिमंत्री भरणे
यंदा पाणी टंचाई असल्यामुळे रब्बी हंगामात सरासरी इतक्या क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता नाही. पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी यंदा चारा पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन द्यावे. चारा बियाणांसाठी कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.
