मुंबई : मुंबई महानगर प्रदेशासह महाराष्ट्रातील प्रमुख नागरी भागांमध्ये रेल्वे जाळ्याचा विस्तार, मेट्रो मार्गिका आणि प्रादेशिक जलद परिवहन प्रणाली (आरआरटीएस) विकसित करण्यासाठी राज्य सरकारने कृती गटाची स्थापना केली आहे. या वाहतूक व्यवस्थांचा कोणत्या भागात आणि कोणत्या स्वरूपात विस्तार करता येईल, याचा अभ्यास करून सहा महिन्यांत अहवाल सादर करण्याची जबाबदारी या कृतीगटावर सोपविण्यात आली आहे.
‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या संकल्पनेच्या अनुषंगाने मुंबई महानगर प्रदेशासह राज्यातील अन्य शहरी भागांमध्ये रेल्वेवर आधारित वाहतूक जाळ्याचा नियोजनबद्ध विस्तार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी रेल्वे विस्तार, मेट्रो मार्गिका आणि प्रादेशिक जलद परिवहन प्रणाली यांचा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात येणार असून याविषयीचा शासन निर्णय नगरविकास विभागाने जारी केला आहे. या संदर्भात ७ ऑक्टोबर २०२६ रोजी नगरविकास विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली होती. त्यामध्ये विविध वाहतूक प्रणालींची व्यवहार्यता, उपयुक्तता आणि आर्थिक क्षमता यांचा सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. मुंबई रेल्वे विकास महामंडळाचा (एमआरव्हीसी) अनुभव लक्षात घेऊन या महामंडळाच्या सहकार्याने अभ्यास करण्यासाठी कृती गट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या कृतीगटाच्या अध्यक्षपदी मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक असतील. नगरविकास विभाग, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन (महामेट्रो), मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि सिडकोच्या प्रतिनिधींचा त्यात समावेश आहे. याशिवाय पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांचे प्रतिनिधी तसेच महा मुंबई मेट्रो संचालन महामंडळाच्या प्रतिनिधींनाही निमंत्रित सदस्य म्हणून सहभागी करून घेण्याची तरतूद आहे. एमआरव्हीसीचे मुख्य व्यवस्थापक (नियोजन) हे या कृती दलाचे सदस्य सचिव असतील.
सेमी हायस्पीड रेल्वेचाही अभ्यास
मुंबई महानगर प्रदेश आणि राज्यातील अन्य प्रमुख शहरी भागांमध्ये रेल्वे जाळ्याचा विस्तार करण्याबरोबरच दोन प्रमुख शहरांना सेमी हायस्पीड रेल्वेने जोडण्याच्या पर्यायाचाही अभ्यास केला जाणार आहे. मेट्रो मार्गिका आणि प्रादेशिक जलद परिवहन प्रणाली यांपैकी कोणती वाहतूक व्यवस्था कोणत्या क्षेत्रासाठी अधिक योग्य ठरेल, याबाबत कृती दल सरकारला शिफारशी करणार आहे. एकात्मिक वाहतूक जाळ्याचे नियोजन करताना आवश्यक असलेल्या धोरणात्मक निर्णयांबाबत आणि विविध यंत्रणांमधील समन्वयाबाबतही कृतीगट सरकारला शिफारशी सादर करणार आहे.
