मुंबई : राज्यातील अनेक रेल्वे प्रकल्प वर्षानुवर्षे रखडले असून यावर्षीच्या अर्थसंकल्पातही महाराष्ट्राच्या पदरी फारसे काही पडलेले नाही. गेल्या दोन वर्षाच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत यावर्षी फक्त १४८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला २३,९२६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर, गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पात २३,७७८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी अर्थसंकल्प सादर केला. तर, सोमवारी केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी राज्यातील प्रत्येक रेल्वे प्रकल्पांसाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्याची घोषणा केली. वैष्णव महाराष्ट्राबद्दल बोलताना म्हणाले, सध्या महाराष्ट्रात १,७०,०५८ कोटी रुपयांची एकूण कामे प्रगतीपथावर आहेत. त्यात बुलेट ट्रेन प्रकल्प आणि मालवाहतुकीसाठी समर्पित असणाऱ्या रेल्वे मार्गाचे काम समाविष्ट आहे. तसेच या प्रचंड गुंतवणुकीमध्ये संपूर्ण राज्यात मार्गिकांची निर्मिती, स्थानकांचा पुनर्विकास आणि सुरक्षा सुधारणांचा समावेश आहे. यूपीए सरकारच्या २००९-१४ या काळामध्ये अर्थसंकल्पात सरासरी वार्षिक १,१७१ कोटी रुपयांची तरतूद केली जात होती. तर, २०२६-२७ या काळामध्ये अर्थसंकल्पात २३,९२६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. महाराष्ट्रासाठी २० पटीने वाढ मोदी सरकारने केली आहे, असे वैष्णव म्हणाले.
महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पासाठी २०२४-२५ या अर्थसंकल्पात २३,७७८ कोटी रुपयांची तरतूद केली होती. तर, यावर्षी २३,९२६ कोटी रुपयांची तरतूद केली. यानुसार फक्त १४८ कोटी रुपयांची वाढ झाली. गेल्यावर्षी महाराष्ट्रात १,५८,८६६ कोटी रुपयांची प्रकल्पे सुरू होती. तर, यावर्षी १,७०,०५८ कोटी रुपयांची प्रकल्पे सुरू आहेत. यात ११,१३४ कोटी रुपयांची वाढ झाली. २०१४ सालापासून ते गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पापर्यंत २,१०५ किमी नवीन रेल्वे मार्गिका बांधण्यात आल्या. तर, यावर्षीच्या अर्थसंकल्पापर्यंत २९५ किमी नवीन रेल्वे मार्गिका बांधण्यात आल्या. तसेच २०१४ सालापासून गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पापर्यंत १,०६२ रेल्वे उड्डाणपूल, भुयारी मार्ग बांधण्यात आले. तर, यावर्षीच्या अर्थसंकल्पापर्यंत १६६ उड्डाणपूल, भुयारी बांधण्यात आले आहेत.
२०१४ सालापासून २,४०० किमी लांबीच्या रेल्वे मार्गिका बांधण्यात आल्या. हे प्रमाण मलेशियातील रेल्वे मार्गापेक्षा जास्त आहे. तसेच २०१४ सालापासून १,२२८ रेल्वे उड्डाणपूल, भुयारी मार्ग तयार केले आहेत. २०१४ पासून ३,७४४ किमी रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण करण्यात आले.
राज्यात ४,९७१ कवच सुरक्षा प्रणालीला मंजुरी मिळाली आहे. तर, ५७६ स्थापित केली आहे. तर, ३,६१७ निविदा प्रक्रियेत प्रगतीपथावर आहेत.

