मुंबई : राज्यात सध्या काही भागात पावसाची नोंद होत असली तरीही एकंदरीतच पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कसे असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या प्रशांत महासागरात ‘एल निनो’ स्थितीमुळे हवामान बदल होत असतानाच भारतात सध्या दोन कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे मान्सूनला पुन्हा एकदा बळ मिळेल, असा अंदाज हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केला जात असून या प्रणालींच्या प्रभावामुळे देशातील काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी नैऋत्य उत्तर प्रदेश आणि लगतच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्यांनतर शनिवारी ८ ऑगस्ट रोजी दक्षिण गंगेच्या खोऱ्यातील पश्चिम बंगाल आणि लगतच्या उत्तर ओडिशामध्ये आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या दोन्ही कमी दाबाच्या प्रणालींचा एकत्रित प्रभाव असल्याने देशातील बहुतांश भागात पावसाचा जोर पुढील काही दिवसात वाढण्याचा अंदाज आहे.

कमी दाबाच्या क्षेत्राकडे अधिक आर्द्रता खेचली जाते तसेच जसजसे हे क्षेत्र पुढे सरकत जाते तसेच त्या क्षेत्राच्या लगतच्या प्रदेशात उंच ढगांची निर्मिती पावसाचे प्रमाण वाढते आणि अनेक भागात मुसळधार पावसाची नोंद होते. राज्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आणि शेवटच्या आठवड्यात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चांगला पाऊस नोंदला गेला.

महाराष्ट्रात पावसाची शक्यता कुठे ?

राज्यातील काही भागात सध्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होत आहे. दरम्यान, १ ते ८ ऑगस्ट या दरम्यान मध्य महारष्ट्रातील काही चांगला पाऊस नोंदला गेला तर कोकण प्रदेशात पावसाचा जोर काहीसा कमी होता. मराठवाडा आणि विदर्भातही पावसाची नोंद झालेली असली तरीही तेथील प्रमाण सरासरी पावसाहून कमीच आहे. त्यामुळे बहुतांश भागात पावसाची तूट कायम आहे. दरम्यान. १३ ते २० ऑगस्ट दरम्यान विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकण प्रदेशातील काही भागात पावसाचा जोर काहीसा वाढेल असा अंदाज हवामान विभागाने ऑगस्ट महिन्यातील दीर्घकालीन अंदाजात व्यक्त केला आहे. त्यामुळे या दरम्यान चांगला पाऊस नोंदला जाईल, अशी शक्यता आहे.

आज ‘यलो अलर्ट’ कुठे ?

हवामान विभागाने रविवारी नाशिक घाट विभाग, नाशिक, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली आदी भागात वादळी पावसाची शक्यता व्यक्त केली असून या भागांना ‘यलो अलर्ट’ दिला आहे. कोकणातील पालघर आणि ठाणे जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.