मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र होते त्यामुळे अनेक भागात पावसाची मोठी तूट कायम आहे. दरम्यान, राज्यात शनिवारपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. निम्म्याहून अधिक राज्यावर वादळी पावसाचा प्रभाव असून हलक्या ते मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. काही भागात मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ तर बहुतांश भागांना वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे.

संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर सप्टेंबर महिन्यात हवामान कसे असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते दरम्यान, सप्टेंबर महिन्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे निर्माण होऊन त्यामुळे राज्यातील काही काही भागात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला होता. सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा कोरडा गेल्यानंतर बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा वेगाने गुजरातच्या दिशेने सरकत आहे.

त्यामुळे राज्याच्या उत्तर भागात कमी दाबाच्या क्षेत्राचा सर्वाधिक प्रभाव आहे. या भागात मध्यम ते जोरदार पावसाची नोंद होत आहे तर उर्वरित भागातही या हवामान प्रणालीचा प्रभाव असून शुक्रवारी सकाळी ८:३० ते शनिवारी सकाळी ८:३० या दरम्यान नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया आदी जिल्ह्यातील काही भागात पावसाचा जोर होता. दरम्यान, आज बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

आज ‘ऑरेंज’ आणि ‘यलो अलर्ट’ कुठे?

हवामान विभागाने आज नाशिक घाट विभाग, धुळे आणि नंदुरबार आदी भागात मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. तसेच पालघर, मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, पुणे आणि पुणे घाट विभाग, सातारा आणि सातारा घाट विभागात हवामान विभागाने वादळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच मराठवाड्यातील बीड, परभणी , हिंगोली, जालना आदी भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असून विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर आदी जिल्ह्यांना

रविवारी हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ दिला आहे. दरम्यान पुढील दोन दिवस राज्यातील काही भागात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान अभ्यासाकांनी व्यक्त केली आहे त्यामुळे मागील काही दिवसांच्या तुलनेने राज्यात चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच पावसाची तूट असणाऱ्या भागांना काहीसा दिलासा मिळण्याचा अंदाज आहे.