मुंबई : कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. काही भागात चोवीस तासात ६०० मिमीहून तर बहुतांश भागात ३०० मिमीहून अधिक पावसाची नोंद सोमवारी झाली. दरम्यान, मंगळवारीही कोकण प्रदेश आणि मध्य महाराष्ट्रातील घाट विभागात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या दरम्यान ताशी ७० ते ८० किमी वेगाने वारे वाहतील अशी शक्यताही हवामान वर्तवली आहे.
सध्या दक्षिण गुजरातपासून ते उत्तर केरळ किनारपाटीपर्यत ‘ऑफ शोअर ट्रफ’ म्हणजे कमी दाबाचा लांब पट्टा पसरला आहे. तसेच समुद्रसपाटीपासून ३.१ ते ७.६ किमी उंचीदरम्यान ‘विंड शिअर झोन’ म्हणजे ज्या भागात वाऱ्यांचा वेग किंवा दिशा अचानक बदलते असा पट्टा कायम आहे. या बदलामुळे हवा वरच्या दिशेने उचलली जाऊन ढगांची निर्मिती होते आणि त्यामुळे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वाढते. या वातावरणात दक्षिण झारखंड आणि उत्तर अंतर्गत ओडिशा परिसरावर सक्रिय असलेला कमी दाबाच्या पट्ट्याचीही भर पडली आहे. सध्या हा कमी दाबाचा पट्टा ताशी १५ किमी वेगाने वायव्य दिशेने सरकत असून पुढील २४ तासांत झारखंड, उत्तर छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेशातून पुढे जाण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
या हवामान प्रणालींच्या प्रभावामुळे सोमवारीही कोकणासह मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाची नोंद झाली. तसेच मंगळवारी या प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र्र आणि मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार पावसाची तर विदर्भातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, मंगळवारी ६० ते ७० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असून त्याची तीव्रता वाढून ती ८० किमी प्रतितासपर्यत जाण्याची शक्यता असून या दरम्यान मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, अशी सूचना हवामान विभागाने दिली आहे.
आज मुसळधार पावसाचा अंदाज कुठे ?
मंगळवारी कोकण किनारपट्टीवरील मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी तर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, सातारा घाट विभाग, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच काही भागात अतिवृष्टीसदृश्य पावसाची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
