मुंबई : राज्यात सध्या काही भागात पावसाची नोंद होत असली तरीही सर्वदूर पावसाचा अभाव दिसून येत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस असेच चित्र कायम राहील. दरम्यान, मध्य प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र कायम असून त्यामुळे मध्य प्रदेश आणि त्यालगतच्या भागात पावसाची नोंद होत आहे. तसेच कोकण प्रदेशासह मध्य महाराष्ट्रातील काही भागात मंगळवारपासून पावसाचा जोर काहीसा वाढला आहे. दरम्यान, आज राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे.
राज्यात सर्वदूर पाऊस पडण्यासाठी हवामान प्रणालींची सक्रियता आवश्यक असते. मात्र, सध्या मान्सूनला बळ देणारी कोणतीही हवामान प्रणाली सक्रिय नसल्याने राज्यात सर्वदूर पावसाचा अभाव आहे. दरम्यान, कोकण प्रदेशासह मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर तसेच विदर्भातील काही भागात वादळी पावसाची नोंद होत आहे. राज्यात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांच्या तुलनेत वादळी पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळत आहे.
कोणत्या प्रदेशावर मान्सून सक्रिय ?
कोकण प्रदेशातील बहुतांश भागात वादळी पावसाची नोंद होत आहे. तसेच हवामान विभागाने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण उत्तर कोकण प्रदेश, तसेच लगतच्या अरबी समुद्राच्या परिसरात सध्या मान्सूनचे वारे सक्रिय आहेत. त्यामुळे या प्रदेशात मंगळवारपासून पावसाचा जोर अधिक आहे. दरम्यान, मंगळवारी पालघर जिल्ह्यातील काही भागांसह मीरा भाईंदर आणि मुंबईच्या उपनगरात पावसाचा जोर होता. मध्य भारतावर एक ‘शिअर झोन’ सक्रिय आहे. म्हणेजच वातावरणातील असा पट्टा, जिथे वेगवेगळ्या उंचीवर वाऱ्यांचा वेग किंवा दिशा बदलते. त्यामुळे आर्द्रता आणि इतर स्थिती अनुकूल असल्यास मुसळधार पावसाची नोंद होण्याची शक्यता वाढते. दरम्यान, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते हळूहळू वायव्य दिशेला सरकत आहे. तसेच त्याची तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज आहे.
आज वादळी पावसाचा अंदाज कुठे ?
नाशिक घाट विभाग, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे घाट विभाग, रत्नागिरी, सातारा घाट विभाग, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट विभाग, गडचिरोली, गोंदिया आदी भागात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून या भागांना ‘यलो अलर्ट’ दिला आहे. तसेच उर्वरित राज्यातील काही भागात हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
