मुंबई : राज्यातील काही भागात वादळी पावसाची तर काही भागात हलक्या सरींची नोंद होत आहे तर काही भागात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. दरम्यान, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्याच्या पश्चिम किनारपट्टीसह काही भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे या दरम्यान राज्यातील काही भागात चांगला पाऊस पडेल, अशी शक्यता आहे. दरम्यान, रविवारी हवामान विभागाकडून राज्यातील बहुतांश भागांना वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे तर काही भागात हलक्या सरींचा अंदाज आहे.
राज्यात तीन-चार दिवसांपूर्वी संपूर्ण प्रदेशात मान्सून दाखल झाला असून त्या दरम्यान मुंबई आणि कोकणपट्ट्यासह बहुतांश भागात जोरदार पावसाची नोंद झाली. मात्र, त्यानंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. मागील एक-दोन दिवसापासून राज्यातील काही भाग वगळता बहुतांश भागात हवामान कोरडे आहे. त्यामुळे राज्यभर झालेला मान्सून सक्रिय कधी होणार असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवसांचे हवामान अंदाज जाहीर केले असून त्यानुसार, १ ते ४ जुलै दरम्यान राज्यातील कोकण किनारपट्टीसह काही भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांकडून व्यक्त केला जात आहे. तर आजपासून पुढील दोन दिवस काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यताही अभ्यासकांनी वर्तवली आहे. या दरम्यान, दक्षिण कोकणात पावसाचा जोर अधिक असेल असाही अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागातही पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान, राज्यातील काही भागात कमाल तापमान २ ते ४ अंशांनी वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे त्यामुळे काही भागात उन्हाची काहिली वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जून महिना संपत आला तरीही राज्यात समाधानकारक पावसाची नोंद झाली नाही. राज्यात १ ते २७ जून दरम्यान सरासरी पावसाच्या ५९ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. आज काही भागात वादळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
आज ‘यलो अलर्ट’ कुठे ?
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक घाट विभाग, पुणे आणि पुणे घाट विभाग, सातारा आणि सातारा घाट विभाग, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट विभाग, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया आदि भागांना हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
