मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात मान्सून पूर्व घडामोडींना वेग प्राप्त झाला असून काही भागात पावसाचा जोर अधिक आहे. तर काही भागात पावसासह गारपिटीचीही नोंद होत आहे. दरम्यान, बुधवारीही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाच्या तीव्रतेपासून काहीसा दिलासा मिळणार असून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे तर काही भागात हलक्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
यंदा देशासह राज्यात उन्हाळ्याची तीव्रता अधिक सहन करावी लागत आहे. मे महिन्यात राज्यातील काही भाग वगळता इतर भागात मान्सूनपूर्व सरींनी नोंद झाली नाही. त्यामुळे नागरिकांना उन्हाची काहिली सहन करावी लागत आहे. दरम्यान, यंदा केरळ येथे मान्सून वेळेआधी दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. त्यामुळे नागिरकांना दिलासा मिळाला होता. मात्र, अंदमान येथे १६ मे रोजी दाखल झालेल्या मान्सूनची वाटचाल काहीशी संथ गतीने सुरु आहे. दरम्यान, हवामान विभागाने मंगळवारी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, केरळ येथे उद्या मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच मान्सून केरळ येथे धडकण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पावसाची नोंद होत आहे. तर मराठवाड्यातील परभणी येथे पावसासह गारपिटीचीही नोंद झाली. मंगळवारी पुणे, नाशिक आदी प्रदेशातील काही भागात पाऊस झाला. तर आज सकाळी मुंबईसह उत्तर कोकणातील अनेक भागात वळवाच्या सरी बरसल्या. राज्यातील काही भागात वादळी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांना ‘यलो अलर्ट’ दिला आहे. तर कोकण प्रदेशातही आज पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
आज ‘यलो अलर्ट’ कुठे ?
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट विभाग, सातारा आणि सातारा घाट विभाग, पुणे आणि पुणे घाट विभाग, अहिल्यानगर, नाशिक आणि नाशिक घाट विभाग, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर, बुलढाणा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली आदी भागांना हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, जळगाव, धुळे, नंदुरबार, सांगली आणि सोलापूर याचबरोबर रायगड, ठाणे, पालघर, मुंबई आदी भागात पावसाचा अंदाज आहे.
