मुंबई : राज्यातील कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रातील घाट विभागात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून रविवारपासून अनेक भागांत पावसाची तीव्रता वाढली आहे. काही भागांत मागील चोवीस तासांत २०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, सोमवारीही हवामान विभागाकडून राज्यातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, काही प्रदेशांतील पावसाची तीव्रता लक्षात घेऊन ‘रेड’, तर काही भागांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
जुलैच्या सुरुवातीलाच राज्यातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला असून मागील पाच दिवसांत विशेषतः कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, या प्रदेशात सोमवारीही पावसाचा जोर कायम आहे. तसेच, उर्वरित मध्य महाराष्ट्रातील काही भाग वगळता बहुतांश भागांना हवामान विभागाकडून कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. याचबरोबर मराठवाड्यातही आज हवामान विभागाकडून पावसाबाबत कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. या भागात मागील पाच दिवसांत समाधानकारक पावसाची नोंद झाली नसल्याने शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत.
पावसाचा जोर का वाढला?
दरम्यान, २ जुलै रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले होते. आता त्याची तीव्रता वाढत असून त्याचे डिप्रेशनमध्ये रूपांतर होत आहे. ही हवामान प्रणाली कमी दाबाच्या क्षेत्रापेक्षा अधिक तीव्र असते. या स्थितीत वाऱ्यांचा वेग अधिक असल्याने ढगांची निर्मितीही मोठ्या प्रमाणात होते. तसेच, ऑफशोअर ट्रफ (Offshore Trough) म्हणजे कमी दाबाचा एक लांब पट्टा तयार झाल्यास अनेकदा उंच ढगांची निर्मिती होऊन अतिवृष्टीसदृश पावसाची शक्यता वाढते. सध्या हा पट्टा महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून कर्नाटकच्या किनारपट्टीपर्यंत सक्रिय असून तो पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे अनेक भागांत मोसमी पावसाचा जोर कायम असून काही भागांत अतिवृष्टीसदृश पावसाची नोंद होत असल्याचे हवामान अभ्यासकांचे मत आहे.
आज ‘रेड’ आणि ‘ऑरेंज अलर्ट’ कुठे?
मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांना हवामान विभागाकडून सोमवारी ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे घाट विभाग, पालघर आणि नाशिक घाट विभाग या भागांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच, कोल्हापूर घाट विभाग, सातारा घाट विभाग, नाशिक, धुळे, जळगाव, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या भागांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
