मुंबई : राज्याच्या हवामानात मागील काही दिवसांपासून चढ-उतार होत आहे. दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची नोंद होत आहे. तसेच काही भागात कमाल तापमानातही वाढ होत आहे. ३० मार्च ते १ एप्रिल या कालावधीत राज्यातील बहुतांश भागात सोसाट्याचा वारा, मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यातील हवामानात मागील काही दिवसापासून झपाट्याने बदल होत आहे. अनेक भागात पाऊस आणि गारपीटीची नोंद होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. पुढील काही दिवस राज्यात पावसाळी हवामान कायम राहणार आहे. शुक्रवारी उत्तर कोकणातील काही भागात उष्ण आणि दमट हवामानाची नोंद झाली होती. तसेच काही भागातील कमाल तापमानातही वाढ नोंदली गेली होती. मात्र, शनिवारी उत्तर कोकणातील काही भागातील कमाल तापमानात काहीशी घट झाल्याचे दिसून आले. विदर्भातील अनेक भागातील कमाल तापमानात १ ते २ अंशांनी वाढ झाली असून अकोला येथे सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. येथील कमाल तापमान ४१. २ इतके नोंदले गेले.

दरम्यान, पुढील चार दिवसांत राज्याच्या कमाल तापमानात मोठा बदल होणार नाही. त्यानंतर २ ते ३ अंशांनी हळूहळू घट होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यामुळे राज्यातील नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील काही भागात पावसाळी हवामान कायम आहे, तर बहुतांश भागात कोरडे हवामान आहे. रविवारी सांगली, सोलापूर, लातूर आणि धाराशिव आदी भागांत मेघगर्जना, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. यावेळी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

यलो अलर्ट कुठे ?

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात ३० मार्च रोजी पावसाची शक्यता असून कोकण प्रांत, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात ३१ मार्च आणि १ एप्रिल रोजी मेघगर्जनेसह पावसाचा शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे या भागांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईकरांना उष्णतेपासून काहीसा दिलासा

मुंबईत शनिवारी उष्ण आणि दमट हवामानाची नोंद झाली नाही. तसेच शुक्रवारच्या तुलनेत कमाल तापमानात काहीशी घट झाल्याचे पाहायला मिळाले . मात्र, तरीही दुपारच्या वेळेत मुंबईकरांना तीव्र उन्हाचा सामना करावा लागला. उन्हामुळे मुंबईकर हैराण झाले असून मे महिन्यात हवामान कसे असेल, याची चिंता आतापासूनच मुंबईकरांना सतावू लागली आहे. शनिवारी हवामान केंद्राच्या सांताक्रूझ केंद्रात ३२ अंश सेल्सिअस तर कुलाबा केंद्रात ३३.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. शुक्रवारी सांताक्रूझ केंद्रात ३७.१ अंश सेल्सिअस कमाल तपमानाची नोंद झाली होती. त्या तुलनेत शनिवारी ५ अंश सेल्सिअसची घट झाल्याचे पाहायला मिळाले.

अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागरावरून येणारे वारे तसेच पश्चिमी विक्षोभ या काही नैसर्गिक कारणांमुळे राज्यात ३१ मार्च पासून पुढील दोन दिवस विशेषत: राज्याच्या अंतर्गत भागात पावसाची शक्यता आहे. -एस. डी. सानप, शास्त्रज्ञ, हवामान विभाग पुणे</strong>