मुंबई : विधिमंडळ अधिवेशनाकरिता मुंबईला यायला निघालेल्या आमदारांनाही मुसळधार पावसाचा फटका बसला. अनेक आमदार अर्ध्या रस्त्यावरून माघारी परतले. तर काहिंची वाहतुकीत तासनतास कोंडी झाली.
पुण्याच्या शिवाजीनगरचे भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना परिस्थितीचा अंदाज येताच पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरीरून परतण्याचा निर्णय घेतला. पण चिपळूण-संगमेश्वरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शेखर निकम यांना दरड कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा होऊन जवळपास १६ ते १७ तास प्रवासात घालवावे लागले. हीच परिस्थिती मुंबईबाहेरील अनेक आमदारांवर ओढवली.
पावसाच्या जोरधारा सोमवारीही मुंबईसह रायगड, रत्नागिरीला झोपडणार, असा अंदाज असल्याने शाळांना आदल्या रात्रीच सुट्टी जाहीर करण्यात आली. मात्र विधिमंडळ अधिवेशनाबाबत अशी कोणतीच सूचना नसल्याने सोमवारी अधिवेशनाकरिता अनेक आमदारांनी पहाटेच आपापल्या गावाहून मुंबईकडे प्रवास सुरू केला.
शेखर निकम पहाटे साडेपाचच्या सुमारास सावर्डेहून निघाले. सकाळीच माझ्या संस्थेचा एक विद्यार्थी मुंबईहून चिपळूणला आला. त्यामुळे मार्ग मोकळा असेल असे वाटले. एरवी साडेपाचला निघाल्यानंतर सकाळी साडेनऊपर्यंत मुंबईला पोहोचतो. परंतु, कशेडीला साडेसहाच्या सुमारास घाटात अडकलो. दरड कोसळल्याने येथील वाहतूक बंद होती. परंतु तेथून जी रखडपट्टी सुरू झाली ती सायंकाळी साडेपाचपर्यंत कायम होती. अखेर सायंकाळी रोह्यामार्गे अलिबागला यायचे ठरले आणि तेथून मुंबई गाठायचा निर्णय घेतला. आता मुंबई गाठेपर्यंत रात्री साडेदहा तरी वाजतील, असे निकम यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
आदल्या रात्री ताप-सर्दी असल्याने आधीच थकवा होता. त्यात प्रवासात एकाच ठिकाणी बसून राहावे लागल्याने त्यांच्या त्रासात भरच पडली. प्रवासात त्यांच्यासोबत चालक आणि खासगी सचिव होते.
शिवाजीनगरचे सिद्धार्थ शिरोळे अर्ध्या वाटेवरून परत
शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे हे समयसूचकतेमुळे अगदी थोडक्यात बचावले. त्यांनी सकाळी साडेआठच्या सुमारास घर सोडले.
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील पहिल्याच टोल नाक्यावर त्यांना गर्दी दिसली. त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी माहिती घेतली असता मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळल्याने रस्ता बंद असल्याचे समजले. तरी ते साधारण अर्धा तास थांबले आणि माहिती घेत राहिले. मात्र परिस्थिती निवळायची चिन्हे नसल्याने त्यांनी अखेर माघारी परतण्याचा निर्णय घेतला. मागे फिरलो नसतो तर वाहतुक कोंडीत अडकलो असतो, असे त्यांनी सांगितले.
आमदार अडकल्याचे कळले आणि…
सकाळी ११च्या सुमारास विधानसभेचे कामकाज सुरू झाले. मात्र अनेक आमदार येऊ न शकल्याने सभागृहात फारशी उपस्थिती नव्हती. हेच चित्र विधान परिषदेतही होते. अवघे १४-२० आमदार उपस्थित होते. बरेचजण प्रवासात अडकल्याचे कळले. त्यामुळे विधानसभेपाठोपाठ परिषदही तहकूब करावी लागली, असे परिषदेचे तालिका अध्यक्ष प्रमोद जठार यांनी लोकसत्ता’ला सांगितले.
