मुंबई : राज्यातील बहुतांश प्रदेशांवर काही दिवसांपासून वादळी पावसाचा प्रभाव असल्याने अनेक भागात चांगल्या पावसाची नोंद होत आहे. दरम्यान, बंगालच्या उपसगारातील कमी दाबाचे अतीतीव्र क्षेत्र ( डीप डिप्रेशन) पश्चिमेकडे सरकत असून काही राज्यांवर त्याच्या प्रभावामुळे वादळी पावसाची नोंद होत आहे. महाराष्ट्रातही या स्थितीचा प्रभाव वाढत असून गुरुवारी राज्यातील अनेक भागात मुसळधार, तर काही भागात अतिवृष्टीसदृश्य पावसाचा अंदाज असून ‘रेड अलर्ट’ दिला आहे. तसेच राज्यातील बहुतांश भागात वादळी पावसाची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात काही दिवसांपूर्वी कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होऊन त्याची तीव्रता वाढली होती त्यानंतर ते अतितीव्र झाले आहे. सध्या हे क्षेत्र छत्तीसगडमधील अंतर्गत भाग तसेच त्याच्या लगतच्या पूर्व मध्य प्रदेशच्या अंतर्गत भागावर सक्रिय असून हळूहळू पश्चिमेकडे सरकत आहे, अशी माहिती हवामान विभागाने गुरुवारी दिली. त्यामुळे राज्यातही बहुतांश भागात वादळी पावसाची नोंद होत असून गुरुवारी पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला असून विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकण प्रदेशातील काही भागात मुसळधार, तर काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, कमी दाबाचे अतितीव्र क्षेत्र महाराष्ट्रातून पुढे सरकण्याचा अंदाज असून शुक्रवारीही पावसाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शुक्रवारीही हवामान विभागाने राज्यातील कोकण प्रदेशासह मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला असून शनिवारपासून पावसाचा जोर कमी होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

‘रेड अलर्ट’ कुठे?

हवामान विभागाने गुरुवारी जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ आणि अमरावती आदी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ दिला आहे.

‘ऑरेंज अलर्ट’ कुठे?

रायगड, पुणे घाट विभाग, सातारा घाट विभाग, नाशिक आणि घाट विभाग, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, वाशिम, अकोला, वर्धा आणि चंद्रपूर आदी भागात मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून राज्यातील बहुतांश भागात गुरुवारी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.