मुंबई : ऑगस्टचा पंधरवडा संपला असून राज्यातील अनेक भागात पावसाची तूट कायम आहे. जुलैमध्ये सर्वदूर पाऊस पडल्याने ही तूट काहीशी भरून निघाली होती. दरम्यान, मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्याने बहुतांश भागात हवामान कोरडे आहे. त्यामुळे पावसाची तूट असणाऱ्या प्रदेशातील नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून त्याच्या प्रभावामुळे उत्तरेच्या काही राज्यांसह पूर्वेच्या बहुतांश भागात पावसाचा जोर आहे.
कमी दाबाच्या क्षेत्राच्या राज्यावर प्रभाव किती ?
जूनमध्ये पावसाने ओढ दिल्यानंतर जुलैमध्ये बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबांच्या क्षेत्रांमुळे महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची नोंद झाली. त्यामुळे दुष्काळाचे सावट असणाऱ्या जिल्ह्यांना काहीसा दिलासा मिळाला होता. सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असले तरीही त्याचा सर्वाधिक प्रभाव पश्चिम बंगाल आणि झारखंड आदी राज्यांवर आहे. कमी दाबाचे हे क्षेत्र हळूहळू वायव्य दिशेला सरकत बिहार राज्यावर या प्रणालीचा प्रभाव वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रावर मात्र कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव नसल्याने वादळी पावसाचा जोर ओसरला आहे. काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होत असली तरीही बहुतांश भागात हवामान कोरडे आहे.
कमी दाबाच्या केंद्रावरून त्याचा सर्वाधिक प्रभाव कोणत्या प्रदेशात असेल हे ठरते. सध्या पश्चिम बंगाल ते उत्तर भारतापर्यंत कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव असल्याने त्या भागात पावसाची शक्यता अधिक आहे. जेव्हा हे क्षेत्र मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या काही भागात सक्रिय असते तेव्हा त्याच्या लगतच्या प्रदेशात उंच ढगांची निर्मिती होऊन कमी कालावधीमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद होते. राज्यात सध्या या क्षेत्राचा प्रभाव नसल्याने पुढील काही दिवस पावसाचा जोर कमीच राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
राज्यात मुसळधार पाऊस कधी ?
राज्यात सध्या कोकण प्रदेश आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर पावसाचा काहीसा जोर आहे. दरम्यान, हवामान विभागाने व्यक्त केलेल्या ऑगस्ट महिन्याच्या हवामान अंदाजानुसार, २० ऑगस्टपर्यंत कोकण प्रदेश आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच २० ऑगस्ट ते २७ ऑगस्टदरम्यान या प्रदेशात पावसाची शक्यता असून काही भागात मुसळधार पावसाची नोंद होईल, असा अंदाज आहे. यादरम्यान विदर्भातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, या कालावधीत सर्वदूर पावसाचा अभाव राहील, असे हवामान अभ्यासकांचे मत आहे.
