मुंबई : राज्यात यंदाच्या हंगामात बुधवारी प्रथमच सर्वत्र पावसाची नोंद झाली. त्यामुळे अनेक भागांना मागील काही दिवसांच्या तुलनेत काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, बुधवारपासून राज्यातील काही भागात पावसाची तीव्रता वाढत असून अतिवृष्टीसदृश्य पावसाची नोंद होत आहे. हवामान विभागाकडून गुरुवारीही राज्यातील बहुतांश जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज असून काही प्रदेशात अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता लक्षात घेऊन‘रेड अलर्ट’ दिला आहे . सध्या अनेक भागात वादळी वारे वाहत असून समुद्राला उधाण येण्याची शक्यता लक्षात घेऊन किनारपट्टीभागांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून पावसाला पोषक स्थिती असल्याने राज्यातील बहुतांश भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह काही भागात मुसळधार पावसाची नोंद होत आहे. राज्यात वादळी पावसाची तीव्रता वाढत असून गुरुवारीही कोकण प्रदेशासह मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. संपूर्ण विदर्भात वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाची तूट कायम असली तरीही मागील दोन दिवसात अनेक भागात पावसाची नोंद झाली असून त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

कोकण – गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरात प्रदेशात नैऋत्य मान्सून सक्रिय आहे. उत्तर मध्य प्रदेशावर चक्रीय वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. तसेच पूर्व – पश्चिम शियर झोन म्हणजेच असा पट्टा जिथे वेगवेगळ्या उंचींवर किंवा जवळच्या भागांमध्ये वाऱ्यांचा वेग किंवा दिशा बदलते आणि त्यामुळे पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते. या हवामान स्थितीमुळे सध्या गुजरातसह महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर वाढला असून गुरुवारीही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, शनिवारपासून राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आज ‘रेड’ आणि ‘ऑरेंज अलर्ट’ कुठे ?

हवामान विभागाने गुरुवारी सकाळी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, पुणे घाट विभाग, पालघर जिल्हा आणि नाशिक घाट विभागात गुरुवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ दिला असून या प्रदेशातील काही भागात अतिवृष्टीसदृश्य पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सातारा घाट विभागाला आज ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे.

यलो अलर्ट कुठे ?

हवामान विभागाकडून गुरुवारी सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट विभाग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली आदी भागात वादळी पावसाची शक्यता वर्तवली असून या भागांना ‘यलो अलर्ट’ दिला आहे.