मुंबई : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांवर सध्या वादळी पावसाचा प्रभाव असून काही भागात मुसळधार, तर काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांत राज्यात चांगला पाऊस नोंदला जात आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकत असून त्याचा प्रभाव वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज वादळी पावसाचा अंदाज असून काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

बहुतांश भागांना वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे.

वायव्य बंगालच्या उपसागरात पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशा किनारपट्टीलगत तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, ते पश्चिम दिशेने पुढे सरकत आहे. तसेच नैऋत्य राजस्थान आणि लगतच्या भागांमध्ये आणि मध्य उत्तर प्रदेशाच्या उत्तर भागात व लगतच्या परिसरात वाऱ्यांची चक्रीय स्थिती सक्रिय असून त्यामुळे सध्या देशातील उत्तर आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये अनेक भागात पावसाची नोंद होत आहे. तसेच महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांवर मागील काही दिवसांपासून वादळी पावसाचा प्रभाव कायम असून काही भागात मुसळधार, तर काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद होत आहे.

राज्यात सोमवारीही अनेक भागात पावसाची नोंद झाली. पालघर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर तसेच मराठवाड्यातील परभणी, लातूर आणि नांदेड या भागात पावसाचा जोर काहीसा जास्त होता (चोवीस तासांच्या आकडेवारीनुसार), तर कोकण प्रदेश, मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांसह विदर्भातही वादळी पावसाची नोंद होत आहे. दरम्यान, हवामान विभागाने राज्यातील बहुतांश भागात मंगळवारी वादळी पावसाची शक्यता व्यक्त केली असून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यातही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

आज मुसळधार पावसाचा इशारा कुठे ?

मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरसह विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया आदी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून या भागांना मंगळवारी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. तसेच रायगड, पुणे घाट विभाग, रत्नागिरी, सातारा घाट विभाग, सिंधुदुर्ग, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि भंडारा आदी भागांमध्ये वादळी पावसाची शक्यता असून हवामान विभागाकडून मंगळावरसाठी ‘यलो अलर्ट’ दिला आहे.