मुंबई: राज्यात २०२० मध्ये मृतांच्या संख्येत आधीच्या वर्षांच्या तुलनेत सुमारे १६.५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे नागरी नोंदणीच्या अहवालानुसार निदर्शनास आले आहे. देशभरात ही वाढ सुमारे ६.२ टक्के असून बिहारपाठोपाठ महाराष्ट्रात जास्त वाढ झाली आहे.

विशेष म्हणजे २०२० मध्ये बहुतांश राज्यांमध्ये मृतांच्या संख्येत वाढ झाली असताना मात्र उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तेलंगणा, केरळ, दिल्ली आणि मणिपूर या राज्यांमध्ये घट झाली आहे.

नागरी नोंदणी २०२० चा अहवाल नुकताच प्रकाशित झाला आहे. यानुसार, २०१९ मध्ये राज्यात ६ लाख ९३ हजार ८०० जणांचा मृत्यू झाला होता. २०२० मध्ये ही संख्या ८ लाख ८ हजार ७८३ वर गेली आहे. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये मृतांची संख्या १ लाख १४ हजार ९८३ ने वाढली आहे. २०२० मध्ये करोनामुळे मृत्यू झालेल्यांची आकडेवारी ५४ हजार ५४७ आहे.

राज्यात सर्वाधिक मृत्यू हे मुंबईत झाले आहेत. मुंबईमध्ये २०२० मध्ये १ लाख ११ हजार ९४२ मृतांची नोंद आहे. यातील सुमारे ११ हजार ९२७ मृत्यू करोनामुळे झाले आहेत. त्याखालोखाल पुणे, ठाणे आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यातील सुमारे ६१ टक्के मृत्यू शहरी भागात, तर उर्वरित ३९ टक्के मृत्यू ग्रामीण भागात झाले आहेत. महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या करोना मृत्यूच्या आकडय़ांपेक्षा १० पटीने अधिक मृत्यू झाल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने केल्यामुळे मृतांच्या संख्येचा वाद पुन्हा चर्चेत आला आहे.

करोनाबाधित परंतु इतर आजारांनी मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृत्यूची नोंद करोना मृत्यू म्हणून करण्याबाबतही या आधी अनेक वेळा वाद झाले होते. अखेर या मृतांचा करोना मृतांमध्ये समावेश करण्याचा निर्णय भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने घेतल्यामुळे एप्रिलमध्ये राज्यातील करोनाबाधित मृतांच्या सुमारे साडेतीन हजारांनी वाढ झाली होती.

मृतांच्या संख्येत २०२० मध्ये नक्कीच मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये काही मृत्यू करोनाबाधितांचे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे प्रमाण सध्या जाहीर केलेल्या आकडेवारीपेक्षा २० ते ३० टक्के अधिक असू शकते. या काळात इतर कारणांनी मृत्यू झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे हे अतिरिक्त मृत्यू करोनामुळेच झाले आहेत असे म्हणता येणार नाही. करोना मृतांच्या आकडेवारीपेक्षा दहापट अधिक मृत्यू भारतात झाल्याच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या दाव्यात काहीच तथ्य नाही, असे मत मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केले.

सर्वाधिक वाढ बिहारमध्ये

देशभरात २०२० मध्ये मृतांच्या संख्येत सर्वाधिक सुमारे १८ टक्के वाढ बिहारमध्ये झाली आहे. त्याखालोखाल महाराष्ट्र (१६.५ टक्के), आसाम (१४ टक्के), गुजरात (१३ टक्के), आंध्र प्रदेश (१३ टक्के), हरियाणा (१२ टक्के), पश्चिम बंगाल (१० टक्के) आणि नागालॅंड (११ टक्के) या राज्यांचा समावेश आहे.

उत्तर प्रदेशसह काही राज्यांमध्ये घट

देशभरात बहुतांश जिल्ह्यांमध्ये २०१९ च्या तुलनेत २०२०  मध्ये मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे; परंतु उत्तर प्रदेशमध्ये मात्र मृतांच्या संख्येत सुमारे आठ टक्क्यांनी घट झाली आहे. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये मृतांच्या संख्येत सुमारे चार टक्क्यांनी वाढ झाली होती. उत्तराखंडमध्ये तर २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये मृतांच्या संख्येत सुमारे ३८ टक्क्यांनी वाढ झाली होती; परंतु २०२० मध्ये मात्र या राज्यात मृतांच्या संख्येत वाढ होण्याऐवजी सुमारे सहा टक्क्यांनी घट झाली आहे. दिल्लीमध्ये २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये सुमारे ०.१७ टक्क्यांनी घट झाली होती; परंतु करोनाकाळात हे प्रमाण आणखी घटले असून ती दोन टक्क्यांवर गेली आहे. मणिपूर आणि तेलंगणामध्ये तर मृतांच्या संख्येत अनुक्रमे २५ आणि ११ टक्क्यांनी घट झाली आहे. दरवर्षी साधारणपणे लोकसंख्येप्रमाणे मृतांच्या संख्येत तीन ते चार टक्क्यांनी वाढ होत असते. महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत मृत्यूची नोंद होण्याचे प्रमाण निश्चितच जास्त आहे.