मुंबई : सुरक्षारक्षकांचा अभाव, वसतिगृहाची अत्यंत दयनीय अवस्था, वेळेवर मानधन न मिळणे आणि रुग्णालयीन पायभूत सुविधांची कमतरता याचा परिणाम राज्यातील निवासी डॉक्टरांच्या कार्यक्षमेतवर आणि मानसिक आरोग्यावर होत असल्याचे ‘महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटने’च्या (मार्ड) सर्वेक्षणातून उघडकीस आले आहे. या सर्वेक्षणामध्ये राज्यातील १८ वैद्यकीय महाविद्यालयातील ५ हजार ८०० हून अधिक निवासी डॉक्टरांचा समावेश होता.
गेल्या अनेक वर्षांपासून निवासी डॉक्टर त्यांच्या विविध मागण्यासाठी वारंवार काम बंद आंदोलन करतात. त्यावेळी मिळणाऱ्या आश्वासनानंतर ते आंदोलन मागे घेतात. मात्र अद्यापपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. गेल्या काही वर्षात निवासी डॉक्टरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्या तुलनेने पायभूत सुविधांमध्ये वाढ झालेली नाही. मार्डने केलेल्या सर्वेक्षणामध्ये राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये २५ टक्के सुरक्षारक्षक कमी असल्याचे आढळले. प्रत्येक महाविद्यालयात सरासरी २०० सुरक्षारक्षक मंजूर असताना, प्रत्यक्षात फक्त १५० कार्यरत आहेत. त्यामुळे डॉक्टरांवर होणारे हल्ले आणि धमक्या वाढल्या आहेत.
तसेच वसतिगृहात अनोळखी व्यक्तींचा वावर वाढला आहे. स्त्री निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे वसतिगृहाची अवस्था अत्यंत वाईक असून, ५० टक्के निवासी डॉक्टरांना वसतिगृहामध्ये जागाच मिळत नाही. त्यामुळे त्यांना असुरक्षित ठिकाणी राहावे लागते. तसेच ५० टक्के वसतिगृहातील उपहारगृह बंद व निकृष्ट दर्जाचे आहेत.
तसेच स्वच्छता व पाणीपुरवठाही अत्यंत वाईट आहे. त्याचप्रमाणे केखे उंदीर, भटके प्राणी वावरत असल्याने डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण असते. राज्यातील एक तृतीयांश वैद्यकीय महाविद्यालये महिन्याच्या १० तारखेपर्यंत मानधन देण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे निवासी डॉक्टरांना उधारीवर जगावे लागत असल्याने त्यांना आवश्यक गरजा भागवणे कठीण होत आहे.
मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम
वैद्यकीय महाविद्यालयांमधील अपुऱ्या सुविधा आणि सुरक्षारक्षकांचा अभाव यामुळे निवासी डाॅक्टरामंध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. वसतिगृहात राहणाऱ्या निवासी डॉक्टरांपैकी फक्त ३९ टक्के निवासी डॉक्टरांना सुरक्षित वाटते, तर ५० टक्के डॉक्टरांना अंशतः सुरक्षित, आणि ११ टक्के डॉक्टरांना पूर्णपणे असुरक्षित वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. या असुरक्षित परिस्थितीमुळे डॉक्टरांच्या मानसिक आरोग्यावर, निर्णयक्षमता आणि रुग्णसेवेवर मोठा परिणाम होत आहे.
मार्डची मागणी
- ९० दिवसांत पूर्ण क्षमतेने सुरक्षारक्षकांची नियुक्ती व अंमलबजावणी करावी.
- सर्व निवासी डॉक्टराना अनिवार्यपणे सुरक्षित वसतिगृह उपलब्ध करून द्यावे.
- प्रत्येक महिन्याला वेळेवर मानधन द्यावे.
- रुग्णालय व वसतिगृहांत पायाभूत सुविधा निर्माण करावी.
