अखेर खडसे यांची हकालपट्टी

एकनाथ खडसे यांची अखेर मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून पक्षाचे अन्य मंत्री व नेत्यांनाही सूचक इशारा दिला आहे.

भाजपचे नेते एकनाथ खडसे. (संग्रहित छायाचित्र)

आरोपांची चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
विविध आरोप आणि पदाचा दुरुपयोग केल्याचे कागदपत्रांवरूनच स्पष्ट झाल्याने भाजपच्या नेतृत्वाने एकनाथ खडसे यांची अखेर मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून पक्षाचे अन्य मंत्री व नेत्यांनाही सूचक इशारा दिला आहे. खडसे यांच्यावरील आरोपांची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीकडून चौकशी केली जाणार असली, तरी नेता कितीही मोठा असला तरी भ्रष्टाचाराला पाठीशी घातले जाणार नाही, हा संदेश भाजपने दिला आहे. केंद्र व राज्यात सत्तेत आल्यापासून भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून गच्छंती होणारे खडसे हे भाजपचे पहिले नेते ठरले आहेत. घटक पक्ष शिवसेनेनेही खडसे यांच्या राजीनाम्याची जाहीर मागणी केली होती. असे असले तरी, पक्ष खडसे यांच्या पाठीशी असल्याचे दाखविण्यासाठी खडसे यांनी राजीनाम्याची घोषणा ज्या पत्रकार परिषदेत केली तिला प्रदेशाध्यक्षांसह भाजपचे अनेक प्रवक्ते खडसे यांच्या जोडीने उपस्थित होते!
खडसे यांच्यावरील आरोपांची पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी गांभीर्याने दखल घेतली होती. काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवणाऱ्या भाजपला खडसे यांना वाचविणे शक्यच नव्हते. आधीच काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी राष्ट्रीय पातळीवर भाजपला खडसेंवरून लक्ष्य केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी अहवाल सादर केल्यावर सारी सूत्रे हलली. पुण्यातील जमीन खरेदी प्रकरणात खडसे यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट झाले. यानुसारच खडसे यांची हकालपट्टी करण्याचा आदेश दिल्लीतून देण्यात आला. खडसे यांच्यासारख्या नेत्याची हकालपट्टी झाली हे योग्य ठरणार नाही म्हणून त्यांनी स्वत:हून राजीनामा दिला, असे चित्र तयार करण्यात आले.
विधान परिषदेची निवडणूक शुक्रवारी बिनविरोध झाली तेव्हाच खडसे यांच्या हकालपट्टीचे संकेत मिळाले होते. मंत्रिपद वाचविण्याकरिता खडसे यांनी जंगजंग पछाडले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी खडसे यांच्या विरोधात दिलेला अहवाल आणि पक्षाच्या प्रतिमेला बसणारा धक्का लक्षात घेता खडसे यांना घरी पाठविण्याचा निर्णय मोदी व शहा यांनी घेतला. खडसे यांना घरी पाठवून मुख्यमंत्री फडणवीस यांनी पक्षांतर्गत प्रतिस्पध्र्याचा परस्पर काटा काढला आहे.
आपल्यावरील सारे आरोप खोटे आहेत वा त्याचे पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत, असा बचावात्मक पवित्रा खडसे यांनी घेतला होता. पण खडसे यांचा हा दावा भाजपच्या नेतृत्वाला मान्य झाला नाही. आपल्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याची मागणी खडसे यांनी केली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीच्या मार्फत खडसे यांच्यावरील आरोपांची चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले.
खडसे यांच्यावरील साऱ्या आरोपांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. तर चौकशीचा फार्स करून काही दिवसांनी त्यांचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश केला जाऊ शकतो, असे मत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केले आहे.

खडसेंची घराणेशाही
खडसे यांना जमीनखरेदी प्रकरणाबरोबरच घराणेशाही राबविल्याचा फटकाही बसला आहे. खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे या रावेर मतदारसंघातून खासदार आहेत. खडसे दुग्धव्यवसायमंत्री असताना त्यांच्या पत्नी मंदाकिनी या ‘महानंद’च्या अध्यक्षा झाल्या आहेत. तर मुलगी रोहिणी या जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षा आहेत. खडसे यांच्या या घराणेशाहीमुळेही पक्षश्रेष्ठी नाराज होते.

घडामोडी आणि हालचाली..
* खडसे यांच्या निकटवर्तीयाला ३० कोटींच्या लाचप्रकरणी १४ मे रोजी अटक.
* पकडलेला पाटील हा तीन महिने रडारवर होता, असे मुख्यमंत्र्यांचे विधान.
* खडसे यांच्याकडून आरोपांचा इन्कार.
* दाऊदच्या कराचीतील निवासस्थानातील दूरध्वनी क्रमांकावरून खडसे यांच्या मोबाइलवर दूरध्वनी आल्याचा हॅकर मनीष भंगाळे यांचा आरोप. दाऊदच्या कथित संभाषणामुळे खडसे यांच्या अडचणींमध्ये वाढ. आम आदमी पक्षाच्या प्रीती मेनन शर्मा यांचे कागदपत्रांच्या आधारे आरोप.
* पुण्यातील भोसरीतील जमीन पत्नी व जावयाच्या नावे खरेदी करण्यासाठी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप.
* खडसे यांच्या विरुद्ध कारवाईसाठी न्यायालयात याचिका. पदाच्या दुरुपयोगावरून पुणे पोलिसात तक्रार दाखल.
* समाजसेविका अंजली दमानिया यांचे आझाद मैदानात उपोषण.

गेल्या आठवडाभरात..
सोमवार : खडसे यांना बोलावून घेऊन मुख्यमंत्र्यांची त्यांच्याशी चर्चा.
मंगळवार : मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारून खडसे मुक्ताईनगरमध्ये.
बुधवार : अमित शहा यांनी खडसे यांच्याबद्दलचा अहवाल मागविला.
गुरुवार : मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत, पंतप्रधान व पक्षाध्यक्षांकडे अहवाल सादर. पक्षाकडून कारवाईचा उचित निर्णय घेतला जाईल, या मुख्यमंत्र्यांच्या विधानाने खडसे यांच्या हकालपट्टीचे संकेत.
शुक्रवार : विधान परिषद निवडणुकीसाठी पक्षाने भरलेला अतिरिक्त जागेवरील अर्ज मागे घेतल्याने कारवाईची शक्यता बळावली. मंत्रिपद वाचविण्याकरिता खडसेंचा आटापिटा. सरसंघचालक मोहन भागवत यांनी भेट नाकारली. गडकरी यांच्या माध्यमातून शेवटचा प्रयत्न.
शनिवार : सकाळी ११.३० वाजता खडसे ‘वर्षां’ बंगल्यावर. पाठोपाठ मुनगंटीवार, तावडे पोहोचले. राजीनाम्याचा पक्षाचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी खडसे यांना सांगितला. दुपारी भाजप मुख्यालयात पत्रकार परिषदेत विविध मंत्री, नेते आणि प्रवक्त्यांसह खडसे यांनी आपल्यावरील सारे आरोप फेटाळत राजीनामा जाहीर केला. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारून राज्यपालांकडे पाठविला.

दाऊदशी संभाषण ते भोसरी जमीन खरेदी घोटाळ्यापर्यंत माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे असून विरोधकांनी एकही ठोस पुरावा दिलेला नाही. तथापि भाजपच्या आजवरच्या नैतिक मूल्यांच्या परंपरेचे पालन करण्यासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. माझ्यावरील सर्व आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून जोपर्यंत निर्दोषत्व सिद्ध होणार नाही तोपर्यंत पदभार स्वीकारणार नाही.
– एकनाथ खडसे, माजी महसूलमंत्री

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra revenue minister eknath khadse loses his job