निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत पद स्वीकारणार नाही!

दाऊदशी संभाषण ते भोसरी जमीन खरेदी घोटाळ्यापर्यंत माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे असून विरोधकांनी आजपर्यंत एकही ठोस पुरावा दिलेला नाही.

eknath khadse
आपने केलेल्या नवीन आरोपांमुळे एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या आहेत.

आरोप सिद्ध करण्याचे खडसेंचे आव्हान
दाऊदशी संभाषण ते भोसरी जमीन खरेदी घोटाळ्यापर्यंत माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे असून विरोधकांनी आजपर्यंत एकही ठोस पुरावा दिलेला नाही. तथापि भाजपच्या आजवरच्या नैतिक मुल्यांच्या परंपरेचे पालन करण्यासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. माझ्यावरील सर्व आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून जोपर्यंत निर्दोषत्व सिद्ध होणार नाही तोपर्यंत पदभार स्वीकारणार नाही, असा पवित्रा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शनिवारी घेतला. त्याच वेळी पक्ष खडसे यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचा पुनरुच्चार प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला.
आजवरच्या राजकीय कारकीर्दीत मी अनेक चढउतार पाहिले परंतु मिडिया ट्रायलमुळे माझ्यासह पक्षाची होणारी बदनामी लक्षात घेऊन माझ्यावरील सर्व आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे एकनाथ खडसे यांनी प्रदेश भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे तसेच गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता उपस्थित होते. खडसे यांच्या विरोधातील कोणत्याही आरोपात तथ्य नसून पक्ष त्यांच्यामागे भक्कमपणे उभा असल्याचे दानवे म्हणाले तर माझ्या फेसबुकवर मी खरेदी केलेल्या भोसरी येथील जमिनीची सर्व कागदपत्रे उपलब्ध असून जावयाच्या गाडीपासून दाऊदच्या संभाषणापर्यंतचे माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे खडसे यांनी सांगितले. यापूर्वी भाजप नेते लालकृष्ण आडवाणी व नितीन गडकरी यांच्यावरही आरोप झाल्यानंतर त्यांनी नैतिकतेच्या मूल्यांची जपणूक करत पदापासून दूर राहाणे पसंत केले होते. भाजपच्या नैतिक मूल्यांच्या परंपरेचे पालन करण्यासाठी आपणही निर्दोषत्व सिद्ध होऊपर्यंत पदभार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे सचिन सावंत यांनी कल्याण येथील जमिनीच्या संदर्भात केलेला आरोप असो की अंजली दमानीया यांचे आरोप असो यातील कोणीही कागदपत्रे घेऊन समोर आलेला नाही, असेही खडसे म्हणाले. काँग्रेसचे सावंत हे ज्या जमिनीची किंमत ४०० कोटी असल्याचे सांगतात त्या जमिनीची किंमत आठ कोटी रुपये आहे.
हेमंत गावंडे यांनी कृषीविद्यापीठाची जमीन बळकाविण्याचा प्रयत्न के ल्याचे सिद्ध झाले असून दामोदर तांडेल यांच्या आरोपला तर कोणताच आधार नाही. महसूल व कृषीमंत्री म्हणून लोकहिताचे ११९ निर्णय घेतले. हे निर्णय घेताना अनेकजण दुखावले गेले. पुण्यातील अनेकांच्या जमिनी सरकारजमा करता आल्या. यातून दुखावलेल्या लोकांनी आरोपांची सरबत्ती सुरु केली असून ज्या प्रकारे माध्यमांनी बातम्या देऊन बदनामी सुरु केली असा आरोप केला.

भाजपच्या नैतिक मूल्यांच्या परंपरेचे पालन करण्यासाठी निर्दोषत्व सिद्ध होऊपर्यंत पदभार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
-एकनाथ खडसे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra revenue minister eknath khadse resigns over land scam allegations