मुंबई : गेल्या चार महिन्यांत राज्यात रस्ते अपघातांत ५ हजार २३३ जणांचा मृत्यू झाला. अपघातातील जखमींना गोल्डन अवरमध्ये वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी परिवहन विभागाने एअर ॲम्ब्युलन्सचा २९ लाख रुपय खर्चाच्या प्रकल्पाचा व्यवहार्यता अभ्यास आणि सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) प्रस्तावित केला आहे. दरम्यान, उच्चाधिकार समितीने आरोग्य विभागाच्या छाननीनंतर प्रस्ताव पुन्हा सादर करण्यास सांगितले आहे.

देशात राज्याचा रस्ते अपघातात तिसरा क्रमांक लागतो. परिवहन विभागाच्या विविध सुरक्षा उपाययोजनांमुळे अपघातांचे प्रमाण घटले आहे. मात्र जखमींना बऱ्याचदा तात्काळ वैद्यकीय मदत (उपचार) मिळत नाही. जखमींसाठी आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी राज्यभरात विशेषतः महामार्गांवर आणि दुर्गम भागांमध्ये एअर ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.

त्यानुसार परिवहन विभागाने व्यवहार्यता अभ्यास आणि सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी सल्लागार नेमण्याचा प्रस्ताव उच्चाधिकार समितीसमोर ठेवला आहे. यासाठी अंदाजे २९ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. आरोग्य विभागाकडून सविस्तर छाननी आणि अभिप्राय मिळाल्यानंतर हा प्रस्ताव पुन्हा सादर करण्यास समितीने परिवहन विभागाला सांगितले आहे. व्यवहार्यता अहवाल आरोग्य विभाग आणि उच्चाधिकार समितीकडे सादर होऊन त्याचे पुनरावलोकन झाल्यानंतर अंमलबजावणीबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

जानेवारी ते एप्रिल २०२६ दरम्यान राज्यात १२ हजार ३८९ रस्ते अपघातांची नोंद आहे. यापैकी ४ हजार ८२७ प्राणांतिक अपघातात ५ हजार २३३ जणांचा बळी गेला. गेल्या काही वर्षांत समृद्धी महामार्गावर झालेल्या अनेक मोठ्या अपघातांमुळे आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसादास होणारा विलंब आणि गंभीर जखमींसाठी जलद वाहतूक सुविधांचा अभाव याबद्दल चिंता वाढली आहे.

अभ्यासात काय

राज्यभरातील अपघातप्रवण क्षेत्र, सध्याची हेलिपॅड पायाभूत सुविधा, वैद्यकीय सज्जता, कार्यान्वयन खर्च, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी आणि सार्वजनिक-खाजगी भागीदारी मॉडेलद्वारे सेवा चालवण्याची व्यवहार्यता यांचा अभ्यास केला जाईल. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग, समृद्धी महामार्ग, कोकण प्रदेशातील महामार्ग यांसारख्या उच्च जोखमीच्या मार्गांना आणि ट्रॉमा केअर उपलब्ध नसलेल्या आदिवासी व दुर्गम भागांना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे.

इतर राज्यांचा अभ्यास

राज्य सरकार केरळ, कर्नाटक आणि दिल्लीमध्ये राबविण्यात आलेल्या एअर ॲम्ब्युलन्स मॉडेल्सचा देखील अभ्यास करत आहे. महामार्गांवरील जीवितहानी कमी करण्यासाठी अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळवून देण्याच्या महत्त्वावर केंद्राने वारंवार भर दिला आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अपघातानंतरच्या पहिल्या तासात वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाल्यास प्रवाशाचा जीव वाचू शकतो. तथापि, वाहतूक कोंडी, खराब कनेक्टिव्हिटी आणि रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यास होणारा विलंब अनेकदा जीवघेणा ठरतो. एअर ॲम्ब्युलन्स ही उणीव भरून काढून गंभीर अपघातातील मृत्यू कमी करण्यास मदत होऊ शकते.