मुंबई : राज्य परिवहन विभागाने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे मुंबई, नवी मुंबईसह राज्यातील रस्ते अपघातात घट झाली आहे. जानेवारी, फेब्रुवारी या दोन महिन्यांत राज्यातील रस्ते अपघात आणि मृत्युची संख्या आठ टक्यांनी कमी झाली आहे. दरम्यान आजही मोठ्या संख्येने नागरिक विनाहेल्मेट प्रवास करीत असल्याचे आरटीओच्या कारवाईतून निदर्शनास येते.

महाराष्ट्र राज्याचा रस्ते अपघातात तिसरा क्रमांक लागतो. रस्ते अपघातांची संख्या २०३० पर्यत ५० टक्यांनी कमी करण्यासाठी परिवहन विभाग अनेक उपाययोजना राबवित आहेत. यात कारवाईपासून समुपदेशनाचा समावेश आहे. जानेवारी – फेब्रुवारी या दोन महिन्यांतील आकडेवाडीनुसार राज्यात प्राणघातक अपघातांची संख्या गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत १९४ ( ८ टक्के) आणि अपघाती मृत्युंची संख्या २१४ ने (८ टक्के) कमी झाली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत नाशिक शहर (५३ टक्के), सिंधुदुर्ग (४७ टक्के), वाशिम (४५ टक्के), नागपूर शहर (३५ टक्के), सोलापूर शहर (३१ टक्के), नवी मुंबई (२९ टक्के), नागपूर ग्रामीण (२८ टक्के), छत्रपती संभाजीनगर ग्रामीण (२५ टक्के), मुंबई शहर (२४ टक्के), अकोला (२३ टक्के), गडचिरोली (२२ टक्के), बीड (२० टक्के), पिंपरी – चिंचवड (२० टक्के) या जिल्ह्यांतील मृत्यु संख्या कमी झाली आहे.

हेल्मेट आणि सीटबेल्टच्या अंमलबजावणीसाठी राज्यात रडार व एआय यंत्रणेचा वापर करण्यात येत आहे. रडार आधारित इंटरसेप्टर वाहनांद्वारे वाहनांवर कारवाई कऱण्यात येते. या कारवाईत विनाहेल्मेट चालकांवर सर्वाधिक कारवाई केली आहे. राज्यात दोन महिन्यात विनाहेल्मेट १ लाख ६५ हजार ३०३ चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर सह प्रवाशांने हेल्मेट घातले नसल्याने २२ हजार जणांना दंड आकारला आहे.

परिवहन विभागाच्या रस्ते सुरक्षा उपायांना यश येत आहे. राज्यातील रस्ते अपघात आणि मृत्युची संख्या कमी होत आहे. वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. – भरत कळसकर, अप्पर परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य.

रस्ते अपघाताचा तपशील

कालावधीअपघातप्राणघातक अपघातमृत्यु
जानेवारी-फेब्रुवारी २०२५६२०९२५५६२७५३
जानेवारी-फेब्रुवारी २०२६६११३२३६२२५३९
घट९६१९४२१४