मुंबई : रस्ते अपघात कमी करण्यासाठी ३ एप्रिल २०२३ रोजी राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची बैठक झाली होती. त्यानंतर तब्बल तीन वर्षानंतर गेल्या मंगळवारी राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची बैठक झाली. या तीन वर्षात राज्यात १.१७ लाखांपेक्षा जास्त रस्ते अपघातात ५० हजार ४८८ जणांनी जीव गमावला. २२ सप्टेंबर रोजी झालेल्या १३व्या राज्य रस्ते सुरक्षा परिषदेच्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रस्ते अपघातासह जीवितहानी कमी करण्यासाठी पोलीस, सार्वजनिक बांधकाम आणि आरोग्य विभागांतील अधिकाऱ्यांना समन्वय साधण्याचे निर्देश दिले.

रस्ते अपघातात आणि त्यातील बळींच्या संख्येत महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या आणि दुसऱ्या स्थानांवर अनुक्रमे उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू ही राज्ये आहेत. राज्यातील रस्ते अपघात आणि मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभाग प्रयत्नशील आहे. नियमानुसार रस्ते सुरक्षा परिषदेची बैठक वर्षातून किमान दोनदा होणे आवश्यक आहे. केंद्रीय मोटार वाहन नियमांच्या नियम २१५ अन्वये गठीत केलेल्या या परिषदेची जबाबदारी अपघातांचा आढावा घेणे, अपघातप्रवण ठिकाणे ओळखणे, रस्ते सुरक्षा उपायांवर देखरेख ठेवणे आणि विविध विभागांमध्ये समन्वय साधण्याचा आहे.

१३ मे २०१५ रोजी जारी अधिसूचनेद्वारे राज्य रस्ते सुरक्षा परिषदेची स्थापना झाली आहे. २०१९ पर्यंत नियमितपणे बैठका होत होत्या, परंतु त्यानंतर परिषदेचे कामकाज मंदावले. २०१९ ते एप्रिल २०२३ च्या बैठकीपर्यंत केवळ चार बैठका झाल्या. एप्रिल २०२३ मध्ये परिषदेची शेवटची बैठक झाल्यापासून जून २०२६ पर्यंत महाराष्ट्रात १,१७,०७० रस्ते अपघात नोंदवले असून, त्यात ५०,४८८ मृत्यू, ७३,४२३ गंभीर जखमी आणि २७,१९८ किरकोळ जखमी झाले आहेत.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी २४ डिसेंबर २०२४ रोजी परिवहन विभागाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर ६३८ दिवसांनी परिवहन मंत्र्यांनी पहिली बैठक घेतली. जानेवारी ते मार्च दरम्यान राज्यात ९,२५९ रस्ते अपघातात ३,८५८ जणांचा मृत्यू झाला आहे.