मुंबई : रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागामार्फत राबविलेल्या विविध उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून जानेवारी महिन्यात राज्यात अपघातांमधील मृत्यूंची संख्या ८ टक्क्यांनी तर अपघात २ टक्यांनी घटले आहेत.
रस्ते अपघात आणि मृत्यूमध्ये महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. अपघात आणि मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी राज्याच्या परिवहन विभागातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
रस्ता सुरक्षा उपायांमुळे राज्यातील विविध जिल्ह्यांतील मृतांच्या संख्येत घट झाली आहे. राज्यात जानेवारी २०२५मध्ये ३ हजार १६४ अपघात झाले होते. त्यात १ हजार ४२७ जणांचा मृत्यु झाला होता. यंदा जानेवारी महिन्यात अपघातात ६४ ने घट होउन राज्यात ३ हजार १०० अपघात झाले. त्यात १ हजार ३१२ जणांचा जीव गेला. अपघाती मृत्युची संख्या ११५ ने घटली आहे.
या जिल्ह्यांतील अपघातात घट
- जिल्हा – टक्के
- नंदूरबार – ५०
- सोलापूर शहर – ३६
- वाशिम – ३६
- सिंधुदूर्ग – २९
- वर्धा – २८
- धाराशिव – २४
- गोंदिया – २२
- अमरावती – २२
- नांदेड – २१
- नागपूर शहर – २१
रडार आधारित इंटरसेप्टर वाहनांनी केलेली कारवाई
- गुन्हा – संख्या
- विना हेल्मेट(चालक) – ८९,६५१
- विना हेल्मेट (सहप्रवासी) – १३,३४८
- ओव्हर स्पीड – ८,५२०
- विना सीटबेल्ट (चालक) – ८,०२४
- अवैध पीयूसी – ४,६३७
- अवैध इन्शुरन्स – ४,५१२
- ट्रिपल सीट – २,५६०
- विना सीट बेल्ट (प्रवासी) – ५३७
राज्यातील अपघातांची संख्या वर्ष २०२३ पर्यत ५० टक्यांनी कमी करण्याचे परिवहन विभागाचे उदिष्ट्य आहे. रस्ता सुरक्षा जनजागृतीकरिता विशेष दुचाकीस्वार व पादचारी वाचवा अभियान राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्यात सर्वात जास्त दुचाकी अपघात होणाऱ्या ११० रस्त्यावर हेल्मेट बंधनकारक करण्याची अंमलबजावणी सुरु केली आहे. – भरत कळसकर, अपर परिवहन आयुक्त.
परिवहन विभागाचे सुरक्षा उपाय
- राज्यस्तरावर व प्रत्येक जिल्हास्तरावर रस्ता सुरक्षा कक्षाची निर्मिती
- आवश्यकतेनुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी रस्ता सुरक्षा उपाययोजना आराखडा
- रडार-इंटरसेप्टर वाहनांमार्फत कारवाईकरिता ३३२ पथकांची निर्मिती
- हेल्मेट-सीटबेल्टच्या अंमलबजावणीसाठी रडार व एआय़ यंत्रणेचा वापर
- वर्षभरात ५३ शासकीय व १३ खासगी स्वयंचलित वाहन तपासणा केंद्र सुरु
- राज्यात ३८ स्वयंचलित वाहन चाचणी पथ
- राज्यातील २५ हजार किमीवर आयटीएमएस वाहतूक प्रणालीची अंमलबजावणी

