मुंबई : ई-चलान थकवलेल्या वाहन चालकांना आता कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित स्वयंचलित कॉलिंग प्रणालीद्वारे आरटीओमध्ये बोलावण्यात येणार आहे. स्वयंचलित कॉलिंग प्रणालीची सुरुवात मुंबईतील चार आरटीओमधून होणार असून संपूर्ण राज्यातील आरटीओमध्ये राबविण्यात येणार आहे. या प्रणालीसाठी ११ कोटी ८० लाखांचा खर्च अपेक्षित आहे.
‘एक राज्य, एक ई-चलन प्रणाली’ २०१९ मध्ये सुरू झाल्यापासून प्रशासनाने ७ हजार २७२ कोटींची ११४ दशलक्ष ई-चलान जारी केली आहेत. त्यापैकी केवळ २ हजार ६३५ कोटींची ५० दशलक्ष ई-चलान भरण्यात आली आहेत. ई-चलानद्वारे जारी केलेल्या दंडाच्या वसुलीचा दर अत्यंत कमी आहे.
सध्या, जारी केलेल्या ई-चलानांपैकी केवळ ४० टक्के चलान वसूल केली जातात. तर उर्वरित ६० टक्के प्रकरणांमध्ये वाहन मालक दंड भरत नाहीत. या समस्येवर उपाय म्हणून, परिवहन विभागाने एआय-आधारित कॉलिंग प्रकल्पासाठी ११ कोटी ८० लाख रुपयांची तरतूद केली आहे . ही प्रणाली वाहन मालकांना थकीत दंडाची आठवण करून पैसे भरण्यासाठी मार्गदर्शन करण्याकरिता स्वयंचलित कॉल करेल.
सध्या, वाहनचालक एमटीपी ॲप किंवा परिवहन वेबसाइटद्वारे त्यांचे ई-चलान तपासू शकतात. मात्र, अनेक वाहन मालक आरटीओ किंवा वाहतूक पोलिसांच्या हाती लागेपर्यंत पैसे भरण्यास विलंब करतात. या उपक्रमाची पहिली चाचणी गेल्या वर्षी मार्चमध्ये ठाणे आरटीओ कार्यालयाद्वारे केली होती. या प्रायोगिक प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळाला.
अनेक वाहन मालकांनी स्वयंचलित दूरध्वनी प्राप्त होताच थकीत देणी त्वरित भरली. या प्रकल्पाच्या यशानंतर, ही प्रणाली राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांमध्ये लागू करण्याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला होता.त्याला मंजुरी मिळाली आहे.
या प्रणालीची अंमलबजावणी मुंबईतील तारदेव, अंधेरी, वडाळा आणि बोरिवली येथील आरटीओ कार्यालयांपासून होणार आहे.एआय कॉलिंगसारखे उपक्रम भविष्यातील ‘स्मार्ट वाहतूक व्यवस्थापना’च्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. याशिवाय नवीन प्रणालीद्वारे, ज्या वाहन मालकांची विमा, योग्यता प्रमाणपत्र आणि पीयूसी संपली आहे, त्यांना ती नूतनीकरण करण्याबाबतही सूचित केले जाणार आहे.
