मुंबई : अनुसूचित जात प्रवर्गाच्या १३ टक्के आरक्षणाचे अ, ब, क, ड असे राज्यात वर्गीकरण होऊ घातले असून त्याप्रकरणी बौद्ध आणि मातंग समाजाच्या परस्पर विरोधात भूमिका असल्याने दोन्ही समाजामध्ये दरी वाढली आहे. दोन्ही बाजुचे नेते, कार्यकर्ते समाजमाध्यमांवर शिवराळ भाषेत आरोप करत असून अनेक जिल्ह्यात गुन्हे नोंद झाले आहेत. दरी कमी करण्यासाठी ‘सलोखा’ परिषदा घेतल्या जात आहेत.

उपवर्गीकरणविषयी न्या. बदर समितीच्या शिफारशी गुलदस्त्यात आहेत. त्यावर लाखभर हरकती व सूचना प्राप्त झाल्या असून सुनावणी घेण्यासाठी मुख्य सचिवांची समिती गठीत केली आहे. अनुसूचित जात प्रवर्गात ५९ जाती असून २०११ च्या जनगणनेनुसार राज्यात या प्रवर्गाची ११ टक्के लोकसंख्या आहे. त्यामध्ये बौद्ध (६२ टक्के), मातंग (१९ टक्के) आणि चर्मकार (१० टक्के) या तीन मोठ्या जाती आहेत. पैकी बौद्ध आणि चर्मकारांचा उपवर्गीकरणाला विरोध असून मातंग समाजाची उपवर्गीकरणाची आग्रही मागणी आहे.

दोन महिने बौद्ध आणि मातंग समाजाकडून याप्रकरणी निषेध आणि पाठिंब्याचे मोर्चे काढले जात आहेत. १५ जिल्ह्यात मोर्चे निघाले असून निळ्या आणि पिवळा झेंड्याची सरळसरळ विभागणी झाली आहे. समाजमाध्यमांवर भूमिका मांडणाऱ्या नेत्यांना ‘ट्रोल’ केले जात आहे. दलित आंदोलनातील सहभागाविषयी जातीय उणीदुणी काढली जात आहेत. पुणे, परभणी, नांदेड, ठाणे आणि पिंपरी-चिंचवड येथे गुन्हे नोंद आहेत. दोन्ही समाजातील वाढती दरी कमी करण्यासाठी पुण्यातून ‘सलोखा’ परिषदांची सुरुवात झाली आहे.

ॲड.प्रकाश आंबेडकर, मंत्री रामदास आठवले आणि ‘बामसेफ’चे वामन मेश्राम यांनी कायदेशीर चौकटीत उपवर्गीकरण करण्यास पाठिंबा दर्शवला आहे, तरी कार्यकर्त्यांची हिंसक भाषा कमी झाली नाही. दलित चळवळीत काही दशके सोबत काम केलेले कार्यकर्ते परस्परविरोधी भूमिका घेऊन उभे ठाकले आहेत. उपवर्गीकरणाला पाठिंबा दर्शवणाऱ्या बौद्ध कार्यकर्त्यांना बौद्ध समाजातून काँम्रेड, लाल्या म्हणून हिणवले जात आहे. ट्रोलचे प्रकार वाढू लागल्याने कवयीत्री प्रज्ञा दया पवार, विचारवंत गौमतीपुत्र कांबळे यांना आवाहन करण्याची वेळ ओढावली.

दोन्ही समाजातील वाढती दरी कमी करण्यासाठी पुण्यातून सलोखा परिषदेने सुरुवात केली आहे.-सचिन बगाडे, अध्यक्ष, सत्यशोधक बहुजन आघाडी, पुणे.

उपवर्गीकरणाच्या लाभाची चर्चा बाजुला ठेवून दोन्ही समाजाकडून एकमेकांच्या जातीवर टिप्पणी केली जात आहे.-राहूल डंबाळे, अध्यक्ष, रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, पुणे.

सामाजिक लढ्यात आघाडीवर असलेल्या मातंग आणि बौद्ध जातींमध्ये ध्रुवीकरण करण्यात सरकार यशस्वी झाले.- काँ. सुबोध मोरे, अण्णाभाऊ साठे चरित्राचे अभ्यासक, मुंबई.

उपवर्गीकरणासंदर्भात बौद्ध नेते सरकारशी भांडायचे सोडून ते मातंग समाजाला शिव्या देत आहेत.-मारोती वाडेकर, सकल मातंग समाज, नांदेड.